राममंदिर उदघाटन सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण अभियान
पुणे महानगर समिती १ ते १५ जानेवारी दरम्यान ११ लाख घरी संपर्क करणार
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पुणे महानगर समितीच्यावतीने घरोघरी जावून श्री रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षदा वितरण व निमंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे. १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत संपूर्ण शहरभरात ११ लाखांहून अधिक घरात हे `गृहसंपर्क अभियान` होणार आहे.
श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या पुणे महानगर समितीचे संयोजक प्रसाद लवळेकर, सहसंयोजक अभिजित बर्वे, विश्व हिंदू परिषद पुणे महानगर पूर्व भाग मंत्री धनंजय गायकवाड, पुणे महानगर पश्चिम भाग मंत्री प्रदीप वाझे यांनी ही माहिती दिली. या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, या हेतूने श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासातर्फे, पुणे महानगर समितीने हे अभियान आयोजित केले आहे.
या अभियानातंर्गत या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने २१ हजारांहून अधिक रामसेवक १ ते १५ जानेवारी २४ दरम्यान घरोघरी जातील. शुभकार्याचे निमंत्रण देण्याच्या परंपरेप्रमाणे अक्षदा, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देतील. तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे, व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे व राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत व देशभरातील धार्मिक, सामाजिक, आर्थिक, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, आरोग्य, साहित्य आदी विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांमध्ये पुण्यातील देखील मान्यवरांचा समावेश असेल. संबंधीत मान्यवरांना भेटून निमंत्रित केले जाणार आहे.
अयोध्येतून आणलेल्या अक्षदा पूजनाचा कार्यक्रम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पुणे शहरातही आयोजित करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २६ नोव्हेंबर रोजी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थान मंदिरात कलशपूजानाने या उपक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पुणे शहरातील विविध ५२१ ठिकाणी झालेल्या अक्षदा पूजनाचे कार्यक्रम संपन्न झाले. या अक्षदा पूजनासाठी समाजाच्या सर्व स्तरातील घटकांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करण्यात आली. या समित्या आपापल्या भागात अक्षदा वितरण व गृहसंपर्क अभियान राबवतील. या अभियानाच्या निमित्ताने पुणे शहरात ५५० ठिकाणी कलशयात्रा काढण्यात आल्या. त्यात १ लाख २० हजारांहून अधिक रामभक्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
१ ते १५ जानेवारी २४ दरम्यान गृहसंपर्क अभियान संपन्न झाल्यानंतर सोमवार २२ जानेवारी रोजी पर्यंत पुणे शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये शहरातील पुणे शहरातील दोन हजारांहून अधिक मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी, व नृत्याचे कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण, शहरातील कलाकार कट्ट्यावर विविध कलांचे सादरीकरण, सोसायटी व मंदिरांमधून रामसंकीर्तनाचा समावेश आहे. या आनंदोत्सवात पुणेकर नागरिक- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.