पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कॅन थो विद्यापीठाच्या सहकार्याने अवयव प्रत्यारोपण विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी, पुणे यांनी व्हिएतनाममधील कॅन थो युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड फार्मसीच्या सहकार्याने अवयव प्रत्यारोपण या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत या क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या व्यासपीठावरून तज्ज्ञ, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी विचारांची देवाणघेवाण केली, तसेच या क्षेत्रातील अद्ययावत माहिती, आव्हाने आणि भविष्यातील नवकल्पना यावर चर्चा केली.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेडिसिन विभागातील डॉ. शुभांगी कानिटकर यांनी अवयव प्रत्यारोपणाबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. यानंतर न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रज्वल राव यांनी परिणामकारक आणि योग्य वेळी अवयवदानासाठी मेंदूच्या मृत्यूचे निदान याचे महत्त्व विशद केले. अवयव प्रत्यारोपण क्रिटिकल केअर मेडिसिनचे डॉ. असीर तांबळी यांनी अवयव प्रत्यारोपण आणि रुग्णाची काळजी याबाबत माहिती देणारा अभ्यासपूर्ण प्रभावी अहवाल सादर केला.

या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण ठरले ते कॅन थो विद्यापीठाचे उप अधिष्ठाता डॉ. ट्रान थाई थान टॅम यांनी व्हिएतनाममधील किडनी प्रत्यारोपणातील आव्हाने, नवकल्पना यासह सुरू असलेली वाटचाल सांगणारे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला कॅन थो विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एल.ई. व्हॅन मिन्ह यांच्यासह अन्य प्राध्यापकही उपस्थित होते. अवयव प्रत्यारोपणातील संयुक्त संशोधन प्रकल्पांवर झालेल्या संवाद कार्यक्रमात डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या हृदय शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अनुराग गर्ग, श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. एम.एस. बर्थवाल, वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम विखे आणि इतर मान्यवर तज्ज्ञ सहभागी झाले होते. त्यांनी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील गुणवत्ता व मूल्यमापनात्मक संयुक्त संशोधनातील संधींबाबत चर्चा केली. योग आणि उच्च रक्तदाब या विषयावरील चर्चासत्राने या एक दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.
या कार्यशाळेत अवयव प्रत्यारोपणानंतरच्या रुग्णांच्या प्रकृतीतील सुधारणा, भविष्यातील आव्हाने आणि सर्वांगीण आरोग्य हे चर्चेतील प्रमुख मुद्दे होते. त्यानंतर सहभागी तज्ज्ञांनी रुग्णालयातीला विविध विभागांना भेटी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील या कार्यशाळेबद्दल म्हणाले, “आमच्या संस्थेची आरोग्य सेवाक्षेत्रातील प्रगत उपचारसुविधा देण्याप्रती आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढवण्याची कटिबद्धता या कार्यक्रमामुळे दिसून येते. देशातील आणि व्हिएतनाम येथील तज्ज्ञांना एकत्र आणून ज्ञानातील अंतर भरून काढणे, नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे आणि जगभरात अवयव प्रत्यारोपण सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळण्यासाठी गुणवत्ता सुधारण्याच्या दिशेने कार्य करण्याचे आमचे ध्येय आहे ”.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. रेखा अर्कोट यांनी ज्ञानाची विचाराची देवाण घेवाण, सहकार्याचे महत्त्व आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम यावर भर दिला. त्या म्हणाल्या, “यासारख्या कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक संधी देत नाहीत, तर त्यांना जागतिक तज्ञांकडून शिकण्याची, महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होण्याची आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पद्धतींची माहिती मिळवण्याचीही संधी प्रदान करतात, तसेच आमच्या भविष्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना जागतिक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा आणि वैद्यकशास्त्राच्या विकसनशील क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी सक्षम करतात.”
अवयव प्रत्यारोपणाच्या महत्त्व विशद करताना वैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शुभांगी कानिटकर म्हणाल्या, “अवयव प्रत्यारोपण हे आधुनिक विज्ञानातील सर्वांत मोलाचे यश आहे. हे अवयव निकामी झालेल्या व्यक्तींना एक चांगले आयुष्य पुन्हा मिळविण्याची आशा आणि संधी देते. या पार्श्वभूमीवर, ही कार्यशाळा ज्ञानाचा प्रसार आणि प्रत्यारोपणाच्या पद्धतींमधील असमानता दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रज्वल राव यांनीही अशा सहकार्यांचे महत्त्व अधोरेखित केले, ते म्हणाले, “अवयव प्रत्यारोपणासाठी मेंदू मृत झाला आहे, याचे निश्चित निदान करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. वेळेवर
अवयवदानासाठी नियमबद्ध पद्धत (प्रोटोकॉल) अद्ययावत करणे आणि तज्ज्ञांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याचे महत्त्व या कार्यशाळेत अधोरेखित झाले. असे सहकार्य आम्हाला एकत्रितपणे आव्हानांना तोंड देण्यास आणि सीमेपलीकडील रूग्णांसाठीचांगली सेवा देण्याची संधी देते.”
अवयव प्रत्यारोपण आयसीयूचे प्रभारी आणि क्रिटिकल केअर टीममधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. असीर तांबोळी म्हणाले, “अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांची आयसीयूमध्ये व्यवस्थित काळजी घेण्यासाठी बहु-अनुशासनात्मक दृष्टिकोन आणि अत्यंत काटेकोरपणे दक्षता बाळगणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही कार्यशाळा सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यात महत्त्वपूर्ण ठरली असून, प्रत्यारोपण यशस्वी करण्याचे प्रमाण वाढविण्यात मार्गदर्शक ठरली आहे. अशा रुग्णांची काळजी घेण्याच्या आमच्या अथक प्रयत्नांमध्ये अशी शिकण्याची संधी मिळणे बहूमूल्य अनुभव आहे.”
या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेने भारत आणि व्हिएतनाममधील संबंध मजबूत करण्यासाठी मैलाचा दगड म्हणून काम केले. या क्षेत्रातील प्रगत पद्धतींवर चर्चा करण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि संयुक्त संशोधनातील शक्यता ओळखण्याची मौल्यवान संधी या कार्यशाळेने दिली. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये जागतिक भागीदारी, नावीन्य आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची आघाडी यामुळे अधोरेखित झाली आहे.








