मावळातील ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी निधी द्या – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे मागणी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघात किल्ले लोहगड, तिकोना, राजमाची, विसापूर आणि ४०० वर्षे पुरातन घोडेश्वर लेणी आहे. या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. विशेष देखरेख व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच घारापुरी लेणीतील शिवमंदिर सोमवारी नागरिकांसाठी खुले ठेवण्यात यावे. घोरावडेश्वर डोंगर येथे रोप-वे मार्ग निर्माण करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
खासदार बारणे यांनी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शेखावत यांनी दिली.



खासदार बारणे म्हणाले, पुणे जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. मावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राचीन गडकिल्ले आहेत. किल्ले लोहगड, तिकोना, राजमाची, विसापूर हे किल्ले आहेत. या किल्ल्यांना भेट देण्यासाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी हजारो पर्यटक, अभ्यासक येत असतात. किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या मोडकळीस आल्या आहेत. त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे. किल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी निधी देण्याची मागणी केली आहे. मंत्री शेखावत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास आहे.

घारापुरी लेणीतील शिवमंदिर सोमवारी नागरिकांसाठी खुले ठेवा
श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असते. मात्र मावळ मतदारसंघातील घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेली अतिप्राचीन लेणी सोमवारीच बंद ठेवली जात आहे. यामुळे दररोज बेटावर येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटक भाविकांना शिवदर्शनाला मुकावे लागत आहे. घारापुरी बेटावर कलचुरी घराण्याच्या कारकिर्दीत कोरण्यात आलेली अतिप्राचीन कोरीव लेणी आहेत. काळ्या पाषाणात योगेश्वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती, अर्धनारीनटेश्वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारसुरवधमूर्ती, नटराज शिव आणि महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या कोरीव शिल्पात अद्भुतरीत्या कोरलेली आहेत. मात्र, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या घारापुरी लेणी पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्ती, देखभालीसाठी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी बंद ठेवली जाते. श्रावण महिन्यातील सोमवारीही बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे किमान श्रावणातल्या सोमवारी तरी शिवदर्शनासाठी पुरातत्त्व विभागाने लेणींचे प्रवेशद्वार पर्यटक शिवभक्तांसाठी खुले करावे, अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली आहे.
घोरावडेश्वर डोंगर येथे रोप-वे करा
देहूरोड येथे घोरावडेश्वर डोंगर आहे. या डोंगरावर पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनीही येथे वास्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या मंदिराला भेट दिली होती. दरवर्षी शिवरात्रीला आजूबाजूच्या जिल्ह्यातील लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांसाठी डोंगरावर जाण्याकरिता पायऱ्यांच्या मार्गाची पुनर्रचना करावी.पायऱ्यांच्या मार्गावर पथदिवे बसविणे आवश्यक आहे. मंदिर डोंगरावर असल्याने रोप-वे मार्गाची निर्मिती करावी. या ऐतिहासिक वास्तूच्या देखभालीची आणि जतनाची काळजी घेण्यासाठी देखभाल कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करावी अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली. या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निर्देश देण्याची ग्वाही मंत्री शेखावत यांनी दिली.








