चिंचवडताज्या घडामोडी

विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

Spread the love

काला म्हणजे सामाजिक ऐक्य आणि भक्त व देवामधील प्रेमाचे दर्शन – ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील

महापूजा, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, धुपारती आणि भव्य आतिषबाजीबरोबरच ढोलताशा पथकाकडून ‘श्रीं’ना मांवनदना

सुमारे १ लाख मोरया भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – ह.भ.प. पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या काल्याच्या किर्तनासह महापूजा, नगरप्रदक्षिणा, या धार्मिक कार्यक्रमांनी आणि भव्य आतिषबाजीबरोबरच महाप्रसादाने व धुपारतीने श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली.

समारोपाच्या दिवशी पहाटे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव आणि चिंचवड ब्रम्हवृंद यांच्या श्रींच्या संजीवन समाधीची विधिवत महापूजा करण्यात आली. त्यानंतर त्यानंतर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली व टाळ आणि वाद्यांच्या गजरात ‘श्रीं’च्या पालखीची नगरप्रदक्षिणा पार पडली. यावेळी हजारो मोरया भक्तांनी या नगरप्रदक्षिणेत सहभाग घेत पालखीचे भक्तिभावे दर्शन घेतले.

यावेळी ह.भ.प पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कीर्तनात त्यांनी काल्याच्या कीर्तनाचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, काला म्हणजे सामाजिक ऐक्य आहे. कोण लहान, कोण मोठा, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, अमक्या जातीचा, तमक्या धर्माचा हे सर्व भेदभाव ज्या ठिकाणी गळून पडतात, त्याला काला म्हणतात. त्याचबरोबर काला म्हणजे प्रेमाचे दर्शन आहे. भक्ताचे आपल्या देवावर आणि देवाचे आपल्या भक्तावर असलेले प्रेम म्हणजे काला आहे.

कोणताही धार्मिक सोहळा असू द्या किंवा धार्मिक सप्ताह असू द्या. बऱ्याचदा प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत जबाबदारीमुळे त्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही. मात्र नाराज होण्याची गरज नाही. कारण असं म्हणतात की संपूर्ण सोहळ्याचे, सप्ताहाचे किंवा कार्यक्रमाचे सार हे काल्याच्या कीर्तनात असते. जर तुम्हाला काल्याच्या कीर्तनाचा लाभ मिळाला तरी तुम्हाला त्या संपूर्ण सोहळ्याचे पुण्य लाभते, असेही ह.भ.प. पाटील आपल्या कीर्तनात म्हणाले

काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १ लाखांहून अधिक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

संध्याकाळी श्री गजलक्ष्मी या ढोलताशा पथकाकडून ढोलताशांच्या गजरात श्रीमोरया गोसावी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. तसेच फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर येथे श्री मोरया गोसावी महाराज यांच्या परंपरेतील २१ पदांची धुपारती आणि श्री मंगलमूर्ती वाडा याठिकाणी ११ पदांची धुपारती करून यावर्षीच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

पाच दिवस चाललेल्या या संजीवन समाधी सोहळ्यात विविध धार्मिक – सामाजिक कार्यक्रम, नामवंत कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे, तसेच नामवंत व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे व पुरस्कार सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button