आमदार लांडगे यांची लक्षवेधी, महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! – चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर ‘बुलडोझर’


– बांगलादेशी, रोहिंग्यांवर कारवाई मागणी, प्रशासनाची थेट ‘पाडापाडी’



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी- चिखली या भागातील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड, भंगार दुकानांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. भंगार दुकानांमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटना आणि बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बेकायदा वास्तव्याबाबत भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले आणि दोनच दिवसांत ‘बुलडोझर’ कारवाई सुरू झाली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.०२ मधील मोरे-पाटील चौक ते कुदळवाडी पोलीस चौकी येथे १८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (३०० मीटर लांबी ) व कुदळवाडी पोलीस चौकी ते विसावा चौक या ३० मीटर रुंद डी.पी.रस्ता ५५० मीटर लाबींच्या डी.पी.रस्ता रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ९ हजार चौ.मी. क्षेत्रातील ३० आर.सी.सी.बांधकामे, तसेच सुमारे ४ हजार चौ.मी. क्षेत्रामधील ४५ वीट बांधकामांसह पत्राशेड इत्यादीवर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे.
तसेच, गेल्या दोन दिवसांमध्ये चिखली- कुदळवाडी परिसरातील एकूण १३ हजार चौ.मी. आर.सी.सी.बांधकामे व पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. यामधील बहुतांशी भंगार व्यावसायिकांचे अनधिकृत दुकाने होती. मंजूर विकास आराखड्यातील रस्ते विकसित करणेकामी कारवाई या पुढेही सुरु राहील, असा इशाराही महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे सोसायटीधारक, स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता. यासह बेकायदेशीरपणे भंगार जाळून रसायनमिश्रीत पाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडल्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासह आगीच्या घटना, बेकायदेशीर भंगार साठवणूक यामुळे या भागात असुरक्षितता, अस्वच्छता आणि पर्यावरणाची हानी होत आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशमधून बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या बहुतेक करुन भंगार, रद्दी दुकानांमध्ये काम करीत आहेत. ही बाब पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये समोर आली आहे. त्यामुळे या कारवाईचे स्थानिक नागरिकांमधून स्वागत होत आहे.
पिंपरी-चिंचवडसह देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अवैधपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंगे यांना प्रतिबंध करणे काळाची गरज आहे. विशिष्ठ समाजाचे लांगुलचालन करण्यासाठी यापूर्वीच्या काळात प्रशासन आणि राजकीय दबाव निर्माण केला जात होता. मात्र, महायुतीच्या सत्ताकाळात कोणत्याही परिस्थितीमध्ये देशविघात कृत्यांचे समर्थन केले जाणार नाही. अनधिकृत भंगार दुकाने आणि बेकायदेशीर व्यावसायिकांवर कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे. स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवडकरांनी सहकार्य करावे. तसेच, पोलीस प्रशासनाने कोणताही अनूचित प्रकार घडणार नाही. याची पूर्णत: काळजी घ्यावी.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी, विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.








