नागपूरला धडकला बांधकाम कामगारांचा मोर्चा


नवनियुक्त कामगार मंत्र्यांशी लवकरच शिष्टमंडळाची चर्चा – मंत्री अतुल सावे



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे सुमारे दोन महिन्यापासून ऑनलाइन पद्धतीने कामकाज पूर्ण ठप्प झालेले असून लाखो बांधकाम कामगारांचे विविध योजना रखडल्या आहेत. विविध मागण्या घेऊन विधिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये नागपुर येथे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कामगारांनी हजारोच्या संख्येने मोर्चाद्वारे धडक देत आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला. यात पिंपरी चिंचवड सह पुणे जिल्ह्यातील कामगारांचा मोठा सहभाग होता.

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संयुक्त समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने यशवंत स्टेडियम येथून मोठ्या घोषणा देत आपल्या मागण्या चे फलक घेऊन मोर्चास सुरुवात झाली विधानमंडळाच्या प्रवेशद्वारासमोर आल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडवला आणि तेथे मोर्च्याचे सभेत रूपांतर करण्यात आले.
कामगार नेते काशिनाथ नखाते, सागर तायडे, कॉ.शंकर पुजारी,विनिता बाळेकुंद्री,समन्वय समितीचे उपाध्यक्ष राजेश माने, संघटक लाला राठोड, निरंजन लोखंडे, निमंत्रक महादेव गायकवाड, महेंद्र वाघमारे मनपा सदस्य किरण साडेकर, कालिदास गायकवाड,विजया पाटील, सलीम डांगे,अर्चना कांबळे, अनिता मोरे यांचे सह भंडारा,गोंदिया,अमरावती,धुळे,जालना, बीड, धाराशिव, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर ,सांगली येथून हजारोंच्या संख्येने येऊन कामगारांनी हे आंदोलन यशस्वी केले.
या वेळ नखाते म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य व राष्ट्रनिर्मितीचे काम खऱ्या अर्थाने बांधकाम कामगार व बांधकाम कामगाराशी संबंधित सर्व मजूर वर्ग करत असतो मात्र राज्य शासनाचे या कामगाराकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले असून नोंदणी व नूतनीकरणाचे खाजगी कंपनीला काम देऊन पांढरा हत्ती पोसण्याचे काम सुरू आहे . कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरण बंद आहे , शिष्यवृत्ती, घरकुल योजना, मृतांच्या वारसांचे लाभ आदी विविध योजनांचे सुमारे 26 लाख अर्ज प्रलंबित असून याला जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे आता मोर्चामुळे घाई गडबडीत बाद करत अर्ज निकालात काढण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. सरकार व महामंडळाचे अधिकारी माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाला सुद्धा टाळाटाळ केली जाते हे गैर असून सरकारला केवळ जाहिरात करायची आहे त्यांना कामगार हिताचे काही पहायचे नाही असे दिसून येते. कामगारांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील कालावधीमध्ये मुंबईमध्ये आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला .
विविध जिल्ह्यातील कामगार प्रतिनिधीने यावेळी भाषणाद्वारे मुद्दे मांडले आपल्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी पोलिसांनी शिष्टमंडळांना बोलावले आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची भेट घडवून दिली यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अद्याप मंत्रिमंडळाचे वाटप झालेले नसून नवनियुक्त कामगार मंत्र्याच्या सोबत लवकरच आपली बैठक घेऊन आपले प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
मोठ्या घोषणा देत पुढील कालावधीमध्ये जर मागण्या मान्य नाही झाला तर मुंबईच्या मैदानावर मोर्चा काढण्याच्या निर्धारासह हे आंदोलन स्थगित करण्यात आले.








