इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे आणि स्वागताध्यक्षपदी वंदना आल्हाट यांची निवड


पाच जानेवारीला मोशी येथे होणार तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन



पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोशी येथे संपन्न होणाऱ्या तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ जयवंत गावडे यांची निवड करण्यात आली आहे; तर स्वागताध्यक्ष म्हणून वंदना हिरामण आल्हाट यांच्या निवडीस मान्यता देण्यात आली. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या काल झालेल्या कार्यकारिणी बैठकीत संमेलनाचे निमंत्रक ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी मांडलेल्या प्रस्तावास एकमताने मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संदीप भानुदास तापकीर होते. ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी ठरावास अनुमोदन दिले.

दादाभाऊ जयवंत गावडे हे प्रथितयश ग्रामीण साहित्यिक असून ‘अजून पहाट झालीच नाही’ या त्यांच्या आत्मचरित्राने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्याशिवाय त्यांचे अनेक कथासंग्रह, कादंबरी आणि कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचा ‘वेलीवरची फुले’ हा कवितासंग्रह राज्यसरकारच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेला असून त्यांच्या अन्य पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रथमच एका महिलेची निवड झाली आहे. सौ. वंदना हिरामण आल्हाट या मोशीगावच्या कन्या असून त्यांना वारकरी सांप्रदायाची पार्श्वभूमी आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड असून साहित्य, कला संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. मोशी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.
इंद्रायणी साहित्य परिषदेच्या काल झालेल्या बैठकीला परिषदेचे सचिव रामभाऊ सासवडे, कार्याध्यक्ष सोपान खुडे, संगीता देवकर – थोरात, राजेश बोराटे, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, अलंकार हिंगे, सुनील जाधव – सस्ते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर दादाभाऊ गावडे आणि वंदना आल्हाट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही देत, ‘आधुनिकीकरणाच्या ओझ्याखाली साहित्य चळवळ कमकुवत होऊ नये’ अशी चिंता गावडे यांनी व्यक्त केली; तर ‘सक्षम समाजनिर्मितीसाठी वाचनसंस्कृती वाढीस लागावी म्हणून महिलांनी या चळवळीत पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे’ वंदना आल्हाट यांनी सांगितले.








