पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची ब्रिटनच्या बीएपीआयओशी भागीदारी


जागतिकस्तरावर अद्ययावत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णांची काळजी या क्षेत्रांत प्रगतिपथावर राहता यावे, या उद्देशाने डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी, पुणे यांनी ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन (बीएपीआयओ) या ब्रिटनमधील प्रख्यात प्रशिक्षण संस्थेशी धोरणात्मक सहकार्य केले आहे. या भागीदारीमुळे वैद्यकीय शैक्षणिक उत्कृष्टता, नवं नवीन संशोधन आणि जागतिक आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रगतीसाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जागतिकस्तरावर वैद्यकीय शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरीने रुग्ण व आरोग्य सेवा क्षेत्रात नाविन्यपूर्ण बद्दल घडविण्याच्या उद्देशाने ही भागीदारी महत्वपूर्ण मानली जात आहे.

या भागीदारीमुळे देशातील एक अग्रगण्य वैद्यकीय संस्था असलेल्या पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र आणि ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन (बीएपीआयओ) यांच्या संयुक्ती कार्यातून प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांच्यासोबत शैक्षणिक उपक्रम, परिसंवाद, कार्यशाळा, आदी माध्यमातून ज्ञानात्मक देवाण घेवाण ,कौशल्य, प्रशिक्षण, आणि संशोधन यामध्ये नावीन्यतेला वाव देत अमुलाग्र बदल घडविण्यात ही भागीदारी महत्वपूर्ण ठरेल . या माध्यमातून आपत्कालीन औषधोपचार, गंभीर स्थितीतील रुग्णावरील उपचार, अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य सेवा सुविधा व व्यवस्थापन, त्वचाविज्ञान,आणि दंतचिकित्सा, या क्षेत्रामध्ये गुणात्मक मूल्यमापन करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
सार्वजनिक आरोग्याच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त नावीन्यपूर्ण उपचार आणि जुनाट आजारांवर सहयोगात्मक संशोधनही या संस्था एकत्रितपणे करणार आहेत. या प्रयत्नांमुळे दर्जेदार वैद्यकीय साहित्य, संशोधन प्रकाशित केले जाईल आणि वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीला महत्त्वपूर्ण चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. या भागीदारीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वैद्यकीय पर्यटनाला चालना देणे. या सहकार्याचा उद्देश जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून संस्थेला प्रस्थापित करणे आणि ब्रिटनमधील तसेच अन्य देशांमधील आंतरराष्ट्रीय रूग्णांना आकर्षित करणे हादेखील आहे.
रुग्णांची सुरक्षा ही या भागीदारीचा आधारस्तंभ असेल. दोन्ही संस्था प्रमाणित सुरक्षा मापदंड विकसित करण्यासाठी आणि नियमित गुणवत्ता सुधारणा प्रशिक्षण लागू करण्यासाठी एकत्र काम करतील. या उपाययोजनांमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा दर्जा निश्चित होईल, त्यामुळे परिणामकारक आणि सुधारित आरोग्य सेवा मिळतील. शिवाय, या सहकार्यामुळे जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण वाढवेल, आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणात आंतरराष्ट्रीय सहकार्याचे मॉडेल तयार करेल तसेच भारत आणि ब्रिटन (यूके) यांच्यातील संबंध अधिक मजबूत होतील.
सुरुवातीला ही भागीदारी वैद्यकीय संस्थेपुरती मर्यादित असेल तसेच या पुढे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी (अभिमत विद्यापीठ) व्यापक सहभाग वाढविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. विदयापीठाच्या संपूर्ण नेटवर्कवर विविध शैक्षणिक, संशोधन आणि आरोग्य सेवा कार्यक्रमांचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक उपक्रमामध्ये या सहकार्याचा विस्तार करण्याचा दृष्टीकोन आहे. ही भागीदारी दोन्ही संस्थांना वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि रुग्णांची काळजी या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर प्रगती करण्यासाठी त्यांच्या एकत्रित सामर्थ्याचा लाभ घेण्याची संधी देईल.
याबाबत यूडब्लूई ब्रिस्टल येथील कॉलेज ऑफ हेल्थ, सायन्स अँड सोसायटीच्या व्हिजिटिंग प्रोफेसर आणि नॉर्थ ब्रिस्टल एनएचएस ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी प्रा. मारिया केन म्हणाल्या, “आज आम्ही एक अनुकरणीय भागीदारी केली आहे. यातून आम्ही एकमेकांकडून शिकू, प्रशिक्षण देऊ आणि पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण, कौशल्यांची देवाणघेवाण आणि संशोधन व तांत्रिक नवकल्पना यांची सांगड घालू.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती, डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील म्हणाल्या, “ही भागीदारी वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढवणाऱ्या जागतिक सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. बीएपीआयओ प्रशिक्षण संस्थेसोबत सीमापार ज्ञानाची देवाणघेवाण करून मानवतेला लाभदायक परिणामकारक नवकल्पनांना चालना देणारे भविष्य घडवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. यशराज पाटील म्हणाले, “हे सहकार्य वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. भारत आणि ब्रिटनमधील (यूके) तज्ज्ञांना एकत्र आणून, आम्ही केवळ शैक्षणिक आणि रोगनिदान क्षेत्रातील उत्कृष्टता वाढवत नाही, तर आरोग्य सेवा क्षेत्रातील नवकल्पना आणि रुग्ण सुरक्षेमध्ये जागतिक नेतृत्वासाठी सक्षम करत आहोत.”
डॉ. डी वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा अर्कोट म्हणाल्या, “बीएपीआयओसोबतची भागीदारी आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी शिकण्याची नवी संधी उपलबध करून देते. विशेष प्रशिक्षण आणि सहयोगी संशोधनावर लक्ष केंद्रित करून, आम्ही वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णांच्या काळजीमध्ये नवे मापदंड स्थापित करत आहोत.
बीएपीआयओ प्रशिक्षण संस्थेचे सीईओ प्रा. पराग सिंघल यांच्यासह यूडब्लूई ब्रिस्टल येथील कॉलेज ऑफ हेल्थ, सायन्स अँड सोसायटीच्या व्हिजिटिंग प्रोफेसर आणि नॉर्थ ब्रिस्टल एनएचएस ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी प्रा. मारिया केन, युकेतील परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयातील या मिशनचे उप प्रमुख जेमी स्कॅटरगुड आणि भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तालयातील हेल्थकेअर, लाइफ सायन्सेस आणि केमिकल्स विभागाच्या क्लस्टर मॅनेजर एडना डिसूझा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या भागीदारीची घोषणा करण्यात आली.
नियोजन, कार्यक्रम विकास आणि देखरेख यावर लक्ष केंद्रित करून २४ महिन्यांत टप्प्याटप्प्याने ही भागीदारी कार्यान्वित केली जाईल. या महत्त्वपूर्ण उपक्रम भारत आणि ब्रिटन (यूके) यांच्यातील दीर्घकालीन सहकार्याला चालना देऊन जागतिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.








