महापालिकेच्या सारथी पोर्टलसह इतर माध्यमांतून आलेल्या तक्रारींचा निपटारा विहीत वेळेत करा, आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचना


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या सारथी पोर्टलसह इतर माध्यमांतून आलेल्या तक्रारींचा निपटारा विहीत वेळेत करून कोणत्याही तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.



पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीत सारथी पोर्टल, आपले सरकार, पीजी पोर्टल, सीएमओ पोर्टल अशा विविध तक्रार निवारण प्रणालींवर आलेल्या तक्रारींचा व त्यावर संबंधित विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, मनोज सेठिया, संजय खाबडे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, अविनाश शिंदे, अण्णा बोदडे, निलेश भदाने, मनोज लोणकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, किशोर ननवरे, अमित पंडित, सीताराम बहुरे, राजेश आगळे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सारथी पोर्टल आणि ऍपद्वारे नागरिक महापालिकेशी संबंधित तक्रारी नोंदवित असतात. नागरिकांचे प्रश्न जलद गतीने सोडवून त्यांच्या तक्रारींचा निपटारा तात्काळ करणे आवश्यक असते. महापालिकेच्या वतीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असताना त्याचे कार्यान्वयन व्यवस्थितपणे सुरू राहील याकडे महापालिका प्रशासनाने सातत्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातून नागरी समाधानाचा निर्देशांक वाढण्यासाठी मदत होत असते. महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबद्दल नागरिक तक्रारवजा सूचना विविध तक्रार प्रणालींद्वारे नोंदवित असतात. अशावेळी संबंधित विभागाने तक्रारींचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांचे विहीत वेळेत निराकरण केले पाहिजे. निराकरण केल्यानंतर त्याची नोंद संबंधित पोर्टलवर देखील तात्काळ घेतली गेली पाहिजे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी अशा तक्रारींची दखल घेऊन गांभीर्याने या तक्रारींचा निपटारा करण्यावर भर द्यावा. विभागप्रमुखांच्या पातळीवर वेळोवेळी या तक्रारींचा आढावा घेऊन निपटारा करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी यावेळी दिल्या. तसेच प्राप्त तक्रारी जाणीवपुर्वक प्रलंबित ठेवल्यास अशा विभागप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त सिंह यांनी यावेळी दिला.








