भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थोर स्वातंत्र्यसैनिक, कृषक क्रांतीचे प्रणेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात कर्जमुक्तीच्या कायद्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले. डॉ. देशमुख यांनी कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करून शिक्षण क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले असून समाजातील जातीय विषमता दूर करण्यासाठीही त्यांनी यशस्वी प्रयत्न केले, असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यात जन्म झालेल्या डॉ. पंजाबराव देशमुख यांनी लोकसभेत तीन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले असून त्यांची जनमानसांत एक विज्ञानवादी, समाजसुधारक आणि सर्वसमावेशक नेता म्हणून ओळख होती. ‘’भुतकाळ विसरा, तलवार विसरा, जातीभेद पुरा आणि सेवाभाव धरा’’ असे डॉ. देशमुख यांचे ब्रीदवाक्य होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण करून दिले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांचीही उभारणी केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.










