भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल शहरात आनंदोत्सव साजरा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपतर्फे आज, बुधवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला.



चाफेकर चौक – चिंचवड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही विधानसभा परिसरात दुपारी 12.00 वाजता शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
यावेळी, भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, निलेश अष्टेकर, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, योगेश चिंचवडे, उपाध्यक्ष कैलास सानप, मधुकर बच्चे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. याबद्दल पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप म्हणाले की, आमचे स्फूर्तीस्थान, प्रेरणास्थान असलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. सबंध महाराष्ट्र आज आनंदाने न्हाऊन निघेल. ज्या माणसाने पाच वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करून नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व कसे असावे याचा आदर्श घालून दिला, त्या देवेंद्रजींना बदनाम करण्याची, त्यांना खाली खेचण्याची, त्यांचे पंख छाटण्याची मोहीमच विरोधकांनी गेल्या पाच वर्षांत चालवली. मात्र, त्यामुळे नाउमेद न होता देवेंद्र फडणवीस एकेक योजनांवर काम करत राहिले, विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत जावी यासाठी झटत राहिले. त्यामुळेच आज जाती, धर्म, लिंगभाव, आर्थिक उत्पन्न या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांना सर्वांनी कौल दिला. जनता एखाद्या नेत्याकडे बघून इतके भरभरून मतांचे दान टाकते, तेव्हा ती बघते त्या व्यक्तिमत्त्वातील आशा. देवेंद्रजींच्या आशादायी व्यक्तिमत्त्वात महाराष्ट्राच्या जनतेने हीच आशा बघितली आणि त्यामुळेच त्यांची उंची आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.








