ताज्या घडामोडीपिंपरी
कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण – कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी


पिंपरी चिंचवड विद्यापीठात एच. आर. समिट संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उद्योग, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रातील समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक असते. त्यासाठी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना उपलब्ध असणाऱ्या संधी प्राप्त करून देण्यासाठी तसेच कंपनीच्या आर्थिक उन्नतीसाठी व नियोजित ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची समन्वयक म्हणून भूमिका महत्त्वपूर्ण असते असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मनीमाला पुरी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे एच. आर. शेपर्स आणि पीसीयू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “एचआर समिट २०२४” या कार्यक्रमात विविध कंपन्यातील मनुष्यबळ अधिकारी उपस्थित होते, यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना डॉ. पुरी बोलत होत्या.
पीसीयू चे प्र- कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, एच. आर. शेपर्स चे संस्थापक आशिष गकरे, हेल्पशिफ्ट कंपनीचे सरबजीत गिल, कोफोर्स सिग्निटी कंपनीचे अंकुर बेरी, जेन्स और टेक्नॉलॉजी लिमिटेड चे एचआर संचालक परेश चव्हाण, नोर्मा ग्रुप प्रॉडक्ट्स कंट्री एचआर हेड पल्लवी सरकार, एम्प्लॉयर ब्रॅण्डिंगच्या नेहा व्यास, न्यू विजन सॉफ्टवेअरच्या व्हाईस प्रेसिडेंट कमल वतनानी, डब्ल्यूएनएस ग्लोबल कंपनीचे विकास दुबे, एम. अँड जी. ग्लोबल सर्विसेस प्राइवेट लिमिटेडचे हेमंत सेठीया, सीयर्स होल्डिंग इंडियाचे अरुणवा मुखर्जी, सकाळ मीडिया ग्रुपचे तुलसी दौलतानी तसेच विविध कंपन्यातील मनुष्यबळ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी “टॅलेंट वॉर क्रायसिस” व “टॅलेंट एम्प्लॉयबिलिटी – रिस्किलिंग, अपस्किलिंग आणि क्रॉसस्किलिंग याविषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये रोजगार क्षमतेतील तफावत दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच संघटनात्मक चपळता वाढवण्यासाठी आणि सतत बदलणाऱ्या नोकरीच्या बाजारपेठेत भरभराट होण्यासाठी भविष्यातील उपलब्ध कौशल्यांसह कर्मचाऱ्यांना आणखी कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी तज्ञांची गरज असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली एच. आर. समीट आयोजित करण्यात आली होती.








