पीएमआरडीएच्या घरांसाठीच्या अर्जास मुदतवाढ


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक 12 आणि वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक 30 व 32 येथील शिल्लक सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागला. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता पीएमआरडीएने 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.



पीएमआरडीएच्या घरांसाठी शुक्रवार(दि. 29) अखेर पाच हजार 216 नागरिकांनी नोंदणी केली. त्यापैकी प्रत्यक्षात दोन हजार 213 नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली. तर, एक हजार 969 नागरिकांनी अनामत रकमा भरल्या आहेत. या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ईडब्ल्यूएसमध्ये 47 आणि एलआयजी प्रवर्गातील 614 सदनिका आहेत. पेठ क्रमांक 30 आणि 32 येथील ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील 347 व एलआयजी (1 बीएचके) प्रवर्गातील 329 सदनिका अशा एकूण एक हजार 337 शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्याची मुदत संपुष्टात आली.

त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत शासकीय यंत्रणा व्यस्त होती. त्यामुळे नागरिकांना उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल प्रमाणपत्र मिळविण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे सदनिकेच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत असल्याने अंतिम मुदतवाढ 15 डिसेंबरपर्यंत दिली आहे. अर्जासाठी ही शेवटची संधी असल्याने त्याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
सुधारित वेळापत्रक जाहीर

सुधारित वेळापत्रकानुसार, सोडतीसाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर एक जानेवारीस स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध होईल. त्यावर दोन डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 13 जानेवारीस सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. 21 जानेवारी रोजी ड्रायरननंतर 22 जानेवारीस अंतिम सोडत काढण्यात येईल. पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रतीक्षा यादीवरील यशस्वी अर्जदारांची नावे अपलोड करण्यात येतील.
अधिक माहितीसाठी हेल्पलाईन : 07316905745
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: http://housing.pmrda.gov.in








