ताज्या घडामोडीपिंपरी
संरक्षण दलातील निवृत्तीवेतनधारक आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात सामंजस्य करार


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंडियन एक्स – सर्व्हिसेस लीग (पुणे जिल्हा) आणि बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने संरक्षण दलातील निवृत्ती वेतनधारकांसाठी संत ज्ञानेश्वर उद्यान, पेठ क्रमांक २८, आकुर्डी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी बँक ऑफ बडोदा पुणे विभागीय महाव्यवस्थापक कविता सिंह, उपव्यवस्थापक (व्यवसाय विकास) जयंत पट्टजोशी, विभागीय व्यवस्थापक शब्बीर मेहसानिया, संरक्षण विभाग बँकिंग सल्लागार निवृत्त ब्रिगेडियर डॉ. संजीव देवस्थळी, इंडियन एक्स – सर्व्हिसेस लीगचे अध्यक्ष वाय. एस. महाडिक, सचिव डी. एच. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कविता सिंह यांनी आपल्या मनोगतातून, “दिवसरात्र दक्ष राहून आणि डोळ्यात तेल घालून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या संरक्षण सेवेचे कर्तव्य तिन्ही दलाकडून चोखपणे पार पाडले जाते. या कार्याप्रति अभिवादन करण्यासाठी अन् कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून बँक ऑफ बडोदा आणि इंडियन एक्स – सर्व्हिसेस लीग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या बँकिंग सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत!” अशी भावना व्यक्त केली. डी. एच. कुलकर्णी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. वाय. एस. महाडिक यांनी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी संरक्षण दलातील निवृत्तीवेतनधारकांना सुलभ बँकिंग सुविधा त्वरित मिळाव्यात म्हणून तजवीज करण्यात यावी, अशी सूचना केली. सदर सूचना बँक व्यवस्थापनाकडून मान्य करण्यात आली; तसेच चित्रफितीच्या माध्यमातून बँक ऑफ बडोदाच्या वतीने संरक्षण दलातील निवृत्तीवेतनधारकांना वैयक्तिक अपघात विमा, तहहयात विमा, एकूण अथवा अंशिक अपंगत्वावर विमा, मुलीच्या विवाहासाठी आर्थिक साहाय्य, बाल उच्च शिक्षण संरक्षण, योद्धा डेबिट कार्ड, लॉकर भाड्यात सवलत इत्यादी सुविधांची माहिती देण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे, बँक ऑफ बडोदा – निगडी शाखा व्यवस्थापक प्रशांत श्रीराम आणि अन्य अधिकारी, इंडियन एक्स – सर्व्हिसेस लीगचे डी. आर. पडवळ आणि अन्य पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. बँक ऑफ बडोदाचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण याज्ञिक यांनी सूत्रसंचालन केले. एम. एन. भराटे यांनी आभार मानले.








