ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

अरविंद एज्युकेशन सोसायटी संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न 

Spread the love
अर्जुन पुरस्काराने सन्मानित शांताराम जाधव यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव डॉजबॉल, हँडबॉल, थ्रो बॉल, लंगडी, धावणे, रिले आदी विविध क्रीडा कौशल्यांनी उत्साहात साजरा केला.
             अर्जुन पुरस्काराने सन्मानित शांताराम जाधव, एनसीसी लीडर मेजर किशोर पाटील, कबड्डीपट्टू राजेश सावंत यांच्या हस्ते कै. नानासाहेब शितोळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवास सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी माणिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, क्रीडाशिक्षक अक्षय नाईक, क्रीडाशिक्षिका सुषमा पवार, तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          दरम्यान, एनसीसी परेड घेण्यात आली. क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी खेळाविषयी शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी डॉजबॉल, हँडबॉल, थ्रो बॉल, धावणे, रिले, लंगडी या खेळांमध्ये मोठा सहभाग नोंदवत आपले नैपुण्य दाखविले. तसेच सूर्यनमस्कार, लाठी-काठी, हुला हुप्स, फ्लॅग ड्रील, कराटे, स्केटिंग, बुद्धिबळ, कॅरम याची उत्कृष्ट प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विजेते खेळाडू व संघांना चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘कै. नानासाहेब शितोळे चॅम्पियन चषक’ही प्रदान करण्यात आला.
          शांताराम जाधव यांनी खेळाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व सांगत आपल्या आयुष्यामध्ये खेळ किती महत्त्वाचा आहे, हे सांगितले. तसेच मेजर किशोर पाटील यांनीही विद्यार्थ्यांना खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
          आरती राव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगत खेळासोबत सकस आहार घेऊन तंदुरुस्त राहण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना आपण आनंदी असेल, तरच आपले आरोग्य चांगले राहते आणि त्याच्यासाठी खेळाची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. प्रणव राव यांनी सांगितले, की उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळाचा नियमित सराव करणे, तसेच एकजूट राखणे अत्यावश्यक आहे. क्रीडाशिक्षक अक्षय नाईक व क्रीडाशिक्षिका सुषमा पवार यांनी खेळातील बारकावे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
          क्रीडा महोत्सवासाठी पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, सहशिक्षिका ज्योती मोरे, प्रीती पितळे, हेमाली जगदाळे, अमृता अमोलिक, शौनक शेटे, मुकेश चव्हाण, भटू शिंदे, उदय फडतरे यांनी परिश्रम घेतले.
         सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती तोडकर व अश्विनी वाघमारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button