नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावं


चिंचवडकरांच्या रास्त मागणीला न्याय द्या..
सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांचे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना साकडे



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महायुतीने दैदिप्यमान असे यश प्राप्त केले. अशाच प्रकारचं अनोख यश चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे नवनिर्वाचित आमदार शंकरशेठ जगताप यांनी खेचून आणले आहे. विक्रमी मतांनी विजय संपादित करीत शंकर जगताप हे आता पिंपरी चिंचवड शहरातील एक दमदार आमदार म्हणून समोर आले आहेत. जगताप यांचा परफॉर्मन्स आणि मतदार संघातील त्यांची लोकप्रिय प्रतिमा भाजपला फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे चिंचवडकरांचा हा आवाज राज्याच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात नागरिकांना हवा आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाबाबत सकारात्मक विचार करावा. समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या जनभावनांचा आदर करीत आमदार शंकरशेठ जगताप यांना मंत्रिपद द्यावं, अशी मागणी पिंपळे सौदागरचे सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे महायुती सरकारकडे केली आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपा उमेदवार शंकर जगताप यांनी एक लाखांपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवीत विजयाची पताका उंचावली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली आहे. दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अश्विनी जगताप यांच्यानंतर भाजपाचे शंकर जगताप यांनी १ लाखांपेक्षा अधिकचं मताधिक्य राखत चिंचवडचा गड काबीज केला. चिंचवड मतदारसंघात केवळ ‘जगताप पॅटर्न’ चालणार, हे या विजयातून अधोरेखित केले. मतदारांनी सलग पाचव्यांदा जगताप कुटुंबावर विश्वास दाखविला आहे. जनतेच्या विश्वासाची आणि स्व. आ. लक्ष्मणभाऊ जगताप यांचा त्याग, पक्षनिष्ठेच्या कामाची पोचपावती म्हणून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आ. शंकर जगताप यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सामावून घेत त्यांना मंत्रीपद द्यावे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे विश्वासू म्हणून त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी जगताप यांनी नेटाने पार पाडली आहे. निवडणुका, पोटनिवडणुका यात त्यांनी जोमाने काम केले. संघटनात्मक पातळीवर देखील ते खरे उतरले आहेत. दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांची कार्यशैली अंगीकारत, सर्व घटकांना त्यांनी सोबत घेतले. संपूर्ण शहरात त्यांची काम करण्याची ताकद, जनसंपर्क पाहता पक्षाकडून त्यांचे नाव मंत्रिपदासाठी का घेतले जाऊ नये? असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करू पाहत आहे. चिंचवड मतदारसंघात भाजपाचे तब्बल ३२ माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ९ व शिवसेनेचे १ असे तब्बल ४२ माजी नगरसेवकांचेही त्यांना पाठबळ आहे. भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते नक्कीच मंत्रीपदासाठी पात्र ठरतात. तेव्हा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी या बाबींचा सारासार विचार करून आ. शंकरशेठ जगताप यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान देत चिंचवडकरांच्या रास्त मागणीला न्याय द्यावा, असे या पत्रकात संदीप काटे यांनी म्हटले आहे.








