आळंदीत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत धार्मिक सोहळा
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) 6 आळंदी कार्तिकी यात्रा २०२४ अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक उपक्रमांसह प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा होणार आहे. २६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आणि २८ नोव्हेंबरला श्रींचा मुख्य ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात होणार असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
या सोहळ्याचे नियोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे मार्गदर्शनात जाहीर करण्यात आले आहे. प्रथा परंपरांचे पालन करीत माऊली मंदिरात होणाऱ्या परंपरेचे कार्यक्रम आळंदी देवस्थान तर्फे जाहीर करण्यात आले असून सोहळ्याची तयारी आळंदी मंदिरात सुरु करण्यात आली आहे.
सोहळ्यात शनिवार ( दि. २३ ) सकाळी ७ ते ९ या वेळेत हैबतबाबा यांचे वंशज, प्रतिनिधी ह.भ.प. बाळासाहेब महाराज आरफळकर पवार यांच्या तर्फे हैबतबाबांच्या पायरीचे पूजन हरिनाम गजरात होऊन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. मंगळवार ( दि. २६ ) आळंदीत कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे. रात्री साडेबारा ते पहाटे २ या वेळेत ११ ब्रम्हवृंदांच्या वेदमंत्र जय घोषात माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती होईल. यावेळी दर्शनरांगेत उभे असलेल्या पहिल्या दाम्पत्याला या महापूजेचा मान दिला जातो. देवस्थान तर्फे मान्यवर दाम्पत्य यांचा सत्कार केला जातो. दुपारी १ वाजता श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा होईल. बुधवार ( दि. २७ ) पहाटे साडे तीन ते चार या वेळेत खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौन्डे यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होईल. त्यानंतर दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत पुरातन २३ फूट उंचीचे वैभवी लाकडी रथातून श्रींची भव्य रथोत्सव मिरवणूक होईल. मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री ११ ते १२ या वेळात खिरापत पूजा, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे. गुरुवारी ( दि. २८ ) माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा हरिनाम गजरात होणार आहे. यात सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत परंपरे नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा होईल. दुपारी १२ ते साडेबारा या वेळेत संजीवन समाधी सोहळ्या निमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती आणि मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप होणार आहेत. रविवार ( दि. १ ) रात्री साडेनऊ ते साडेबारा या वेळेत श्रींचा छबीना मिरवणूक होणार आहे.
या सोहळ्यात २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधित माऊली मंदिरात दररोज पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.