मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य – भास्कर रिकामे
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “आवर्जुन मतदान करणारा तोच खरा सुजाण नागरिक आहे. साहित्यिक काव्य जागर करत मतदानाबद्दल जागृती वाढवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मतदारांच्या उदासीनतेमुळे चुकीचे प्रतिनिधी निवडले जाऊ शकतात. कुठल्याही प्रलोभनांना किंवा फेक नरेटिव्ह ला बळी न पडता सर्वांनी मतदान हे केलेच पाहिजे. मतदान न करणाऱ्याला व्यवस्थेवर आणि प्रशासनावर टीका करण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. प्रौढ मतदानावर आधारित लोकशाहीमध्ये लोकांना हवे ते राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार आहे. मतदानावर देशाचे आणि राज्याचे भवितव्य अवलंबून असते. म्हणून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर रिकामे यांनी केले.
पिंपरी चिंचवड साहित्य मंच ने आयोजित केलेल्या “मतदार राजा जागा हो !” या मतदान जनजागृतीपर काव्यसम्मेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, पिंपरी चिंचवड साहित्य मंचचे अध्यक्ष राजेंद्र घावटे, जेष्ठ नागरिक महासंघाचे सचिव प्रा. हरिनारायण शेळके, प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष राजू गुणवंत, शाहू वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, प्रकाश ननावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रंगतदार झालेल्या कविसम्मेलनामध्ये अनेक कवींनी दर्जेदार रचना सादर केल्या.
प्रदिप गांधलीकर यांनी “मतदार राजा तुला लोकशाहीची आण “,
आय. के. शेख यांनी “चल, चल जाऊ मतदानाला”, वंदना ईंनानी यांनी “लोकांनी निर्मिलेली लोकशाही, नको वाटायला बेबंदशाही”, सुहास घुमरे यांनी “सरकार याचकांना देते बरेच काही, रांगेत थांबण्याचा ज्यांना सराव आहे”, प्रा. अनिता सुळे यांनी, ” सुज्ञ आम्ही मतदार , आम्हाला नाही कुणाची भीती”, अशोक वाघमारे यांनी, “सारून अंधाराला, वाचवू आज देशाला”, हेमंत जोशी यांनी , “आपल्याला पटलेल्या वर खैरात मतांची करावी” अशा उद्बोदक काव्यरचना सादर केल्या. कविवर्य कैलाशचंद्र सराफ, नितीन यादव, रशीद अत्तार, प्रा. पी. बी. शिंदे, शामला पंडित (दीक्षित), सीमा गांधी आदींच्या रचनांना उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. माधुरी विधाटे यांनी लिहिलेल्या मतदान प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
प्रास्ताविक राज अहेरराव यांनी केले.
सूत्रसंचालन सीमा गांधी व राजेंद्र घावटे यांनी केले.
आभार प्रदर्शन राजेंद्र पगारे यांनी केले.
सर्व कवींच्या हस्ते स्वामी समर्थ मंदिरात आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली.