पाच हजार नाराज लघुउद्योजक भोसरी मतदारसंघात परिवर्तन घडवणार
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी- चिंचवड आणि हिंजवडी औद्योगिक परिसराबरोबरच भोसरी मतदारसंघातील तळवडे, चिखली, मोशी हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला ‘इंडस्ट्रियल बेल्ट’ आहे. मात्र गेल्या दहा वर्षात या परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले. लघु उद्योजकांच्या समस्या लक्षात घेतल्या गेल्या नाहीत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, रस्ते आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे लघुउद्योजक त्रस्त आहेत. त्यामुळे या भागातील पाच हजाराहून अधिक लघु उद्योजकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. कारखानदारीसाठी पोषक आणि पूरक असे धोरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बोलण्यातून पुढे येत असून लघुउद्योजक यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये इंडस्ट्रियल ग्रुपच्या वतीने उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांनी अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला. लघुउद्योजकांनी यावेळी पुणे नाशिक रस्त्याच्या रुंदीकरणानंतरही वाहतुकीची कोंडी, तळवडे, चिखली, मोशी या भागातून कनेक्टिंग रस्ते, अंतर्गत रस्त्यांची रखडलेली कामे, पुणे नाशिक रेल्वे या सगळ्या रखडलेल्या कामांवरून नाराजी व्यक्त केली.
उद्योजकांनी गेल्या दहा वर्षात उद्भवलेल्या समस्यांचा पाढाच वाचला. भोसरी मतदारसंघातील तळवडे, चिखली, मोशी हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला ‘इंडस्ट्रियल बेल्ट’ आहे. या भागामध्ये अजूनही विकास आराखड्यातील रस्ते विकसित झालेले नाही. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. पाणी आणि वीजेची समस्या देखील वारंवार उद्भवत आहे. खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे .अनेकदा कामाच्या शिफ्ट बंद कराव्या लागतात. कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. मात्र गेल्या दहा वर्षात ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम देखील करण्यात आलेले नाही.या भागात शहरातून अनेक जण कामानिमित्त ये जा करतात. या भागाला प्राधान्याने रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे होते. मात्र गेल्या दहा वर्षात याकडे अतिशय मोठे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तळवडे ते मोशी भागात दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. या समस्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. सत्ताधाऱ्यांनी कारखानदारीला पोषक असे कोणतेच धोरण अवलंबविले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कारखानदारी वाढवण्यासाठी सर्व स्तरीय प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीच्या विकासामध्ये त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे .त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केल्याचे इंडस्ट्रियल ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.
पाच हजार उद्योजकांचे समर्थन
भोसरी विधानसभा मतदारसंघातील तळवडे, चिखली, मोशी यासारख्या भागामध्ये 5 हजार हून अधिक लघुउद्योजक आहेत. या उद्योजकांनी अजित गव्हाणे यांना समर्थन दिले आहे. उच्चशिक्षित असलेल्या अजित गव्हाणे यांच्याकडून आम्हाला उद्योगवाढीच्या दृष्टीने अपेक्षा आहेत. त्यांच्या माध्यमातून येथील कारखानदारीला बळ मिळेल असे देखील उद्योजकांनी म्हटले आहे.
कोणत्याही शहराला विकासाच्या वाटेने पुढे न्यायचे असेल तर शहरातच रोजगार निर्मिती झाली पाहिजे. रोजगाराच्या संधी शहरात निर्माण झाल्या पाहिजेत. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तो ‘स्कोप’ आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले का असा प्रश्न मोशी, चिखली,तळवडे, भोसरी एमआयडीसी येथील प्रलंबित प्रश्नांकडे पाहून जाणवतो. हेच प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. याच मुद्द्यावर शहरातील उद्योजक देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत यातून परिवर्तन अटळ आहे .
अजित गव्हाणे
उमेदवार महाविकास आघाडी
भोसरी विधानसभा मतदारसंघ