चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

“वाजपेयी म्हणून जगणे अवघड!” – प्रा. डॉ. नितीन करमळकर

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “वाजपेयी वाचणे सोपे; पण वाजपेयी म्हणून जगणे अवघड आहे!” असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी व्यक्त केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात प्रा. डॉ. करमळकर बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सदस्य डॉ. गिरीश आफळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. नितीन करमळकर पुढे म्हणाले की, “अटलबिहारी वाजपेयी यांच्यात घरातूनच कवित्वाची रुची निर्माण झाली; तसेच सामाजिकतेचे संस्कार घडले. शालेय वयातच त्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवले. जनसंघाची उभारणी करण्यात श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय आणि वाजपेयी यांचा सिंहाचा वाटा होता. मुखर्जी यांचे सचिव म्हणून काम करताना त्यांच्यावर जनसंघाच्या विविध मुखपत्रांची जबाबदारी आली अन् त्यातून पत्रकार म्हणून त्यांची जडणघडण झाली. पहिल्या निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर पुढे बलरामपूर मतदार संघातून विजय मिळवून संसदेत खासदार म्हणून त्यांचा प्रवेश झाला. प्रभावी आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वामुळे पंडित नेहरू यांनी त्यांचे अनेकदा कौतुक केले होते. सत्तारूढ पक्षावर धोरणात्मक टीका करतानाही वाजपेयी यांनी विरोधकांच्या वैयक्तिक गुणांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अल्पमतात असूनही सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केला नाही; पण पुढील काळात समविचारी पक्षांची मोट बांधली. तरीही सत्तेच्या राजकारणात वाजपेयी यांची निर्लेपवृत्ती ठळकपणे अधोरेखित झाली. त्यांच्या सर्वांगीण कार्याची आपल्या देशाने खूप उशिरा दखल घेतली; पण म्हणावा तसा उचित गौरव केला नाही. राजकीय कार्यकर्त्यांनी वाजपेयी यांच्या किमान काही गुणांचा अंगीकार करावा!” असे आवाहन त्यांनी केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त माजी नगरसेविका शर्मिला बाबर आणि ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघ, निगडी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी दोन दिवसीय दोन दिवसीय एकेरी पुरुष कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमहापौर शैलजा मोरे आणि शर्मिला बाबर यांनी कॅरम खेळून अभिनव पद्धतीने स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धकाचे किमान वय साठ वर्षांच्या पुढे असावे आणि तो पिंपरी – चिंचवडमधील रहिवासी असावा असे दोन निकष होते. त्यामध्ये सुमारे ६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सुधाकर चव्हाण यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला; तर श्रीकांत बाबर, विष्णू भुते, राम तायल, शंकर होनकळस, सलीम सैय्यद, किरण पोळ, गिरीश जोशी अन्य विजेते ठरले. सन्मानचिन्ह आणि रोख बक्षिसे प्रदान करून विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघ निगडी प्राधिकरणाचे अध्यक्ष सुरेश कारंडे, नंदकुमार साने, विजय शिनकर, चंद्रकांत तेली, विजय तळेकर, बाबूराव फडतरे, बाळ भिंगारकर, ओंकार ढवळे, श्रीनिवास शेवडे यांनी संयोजनात सहकार्य केले. सुधीरकुमार अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button