ब्रिगेड, नोवाकोड, इनोवला प्रथम पारितोषिक एमआयटी एडीटी विद्यापीठातील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचा समारोप


पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीनंतर ब्रिगेड (शेती, अन्न व ग्रामीण विकास), नोवाकोड (मेड, बायो, हेल्थटेक), इनोव्ह-सांडपाणी विल्हेवाट मशीन (हेरिटेज व कल्चर), आयोनिक्स(स्पोर्टस व फिटनेस) आणि यू.पी. स्टार्स (स्मार्ट ऑटोमेशन) या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह आपापल्या गटातील विजेतेपदाला गवसणी घातली.



या पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी देशातील आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, चंडीगढ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील एकूण २७ संघांची निवड झाली होती. त्यामध्ये अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघाच्या नवकल्पनांचे परिक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना भारत सरकारकडून प्रत्येकी एक लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

याप्रसंगी, एमआयटी एडीटी मिटकॉमच्या संचालिका प्रा.डॉ.सुनीता कराड, ‘वाय४डी’ फाउंडेशनचे प्रफुल्ल निकम, ‘हिरो मोटोकॉर्प’चे उत्कर्ष मिश्रा, ‘फुलक्रम डिजीटल’चे बेंसली झकारिया, ‘एआयसीटीई’चे उपाध्यक्ष डॉ.अभय जेरे, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल केंद्र प्रमुख डाॅ.रेखा सुगंधी, डाॅ.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारत सरकारकडून दूरदृष्ट प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या हार्डवेअर गटाच्या समारोपात एआयसीटीई’चे चेअरमन टी.जी. सितारामन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित ‘भारत@२०४७’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवस संशोधन करून मांडलेल्या नवकल्पनांमुळे या उपक्रमाच्या यशस्वितेत भर पडणार आहे. सध्या देशासमोर असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनाला चालना देण्याचे काम स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.
चौकट
स्पर्धेचा निकाल
- शेती, अन्न व ग्रामीण विकास- ब्रिगेड (श्री रामकृष्ण अभियांत्रिकी महाविद्यालय, कोईंबतूर, तमिळनाडू)
- मेड, बायो, हेल्थटेक- नोवाकोड (अविनाशिलिंगम गृहविज्ञान महाविद्यालय, कोईंबतूर, तमिळनाडू)
- हेरिटेज व कल्चर- इनोव्ह-सांडपाणी विल्हेवाट मशीन (श्री व्यंकटेश्वरा अभियांत्रिकी महाविद्यालय, पद्दूचेरी)
- स्पोर्टस व फिटनेस- आयोनिक्स (श्रीकृष्ण तंत्रज्ञान महाविद्यालय, कोईंबतूर, तमिळनाडू)
- स्मार्ट अँटोमेशन- यू.पी. स्टार्स (आयआयएटी विद्यापीठ, मेरठ, उत्तर प्रदेश)








