अल्पसंख्यांक समाजाने महायुतीला ताकद देण्यासाठी बनसोडे यांना निवडून द्यावे – आ. इद्रिस नायकवडी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पुढाकाराने अल्पसंख्यांक समाजासाठी विशेषता मुस्लिम समाजासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी महायुतीला ताकद दिली पाहिजे, त्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी अल्पसंख्यांक समाजाने उभे राहावे असे आवाहन आमदार व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केले.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आठवले गट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी अल्पसंख्याक समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर योगेश बहल, भाजपाचे शहर सरचिटणीस माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शमीम पठाण, माजी नगरसेविका अमीना पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख व हसीन अख्तर, माजी नगराध्यक्ष शफिक शेख तसेच शहरातील अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम केले आहे. मतदार संघातील तसेच शहरातील मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात त्यांनी नागरिकांना वैद्यकीय, शैक्षणिक व आवश्यक ती भक्कम मदत केली आहे. काम करणाऱ्या आमदार बनसोडे यांना पुन्हा एकदा बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन योगेश बहल यांनी यावेळी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसुफ कुरेशी, हबीब शेख, गुलाम रसूल सय्यद, शहाजी अत्तार, शक्रुल्ला पठाण, फैज दलाल, नजीर सय्यद, नूर खान आदींनी पुढाकार घेतला.
—————————————-