केलेले काम, जनतेचे आशीर्वाद आणि महायुतीचा पाठिंबा या जोरावर मी पुन्हा निवडून येईन, आमदार अण्णा बनसोडे यांचा विश्वास
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – माझा जनसंपर्क, आजवर केलेली कामे, राबवले समाजोपयोगी उपक्रम आणि महायुतीचा पाठिंबा या जोरावर मी पुन्हा निवडून येईन, अशा विश्वास राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना आमदार अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. उमेदवारी माघारी घेतलेल्या 21 जणांपैकी 19 उमेदवारांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. जे उमेदवार नाराज होते त्यांची नाराजी दूर झाली आहे. सर्वजण आजपासून प्रचारात सक्रिय सहभागी झाले आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे 938 सदनिका, दापोडी ते निगडी हायवेलगत पाईप लाईन, दापोडी ते निगडी दरम्यान अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते विकसीत, बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाचे लोकार्पण, यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे निवासी डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था व पदव्युत्तर शिक्षणासाठी इमारत, निगडी-रावेत किवळे यांना जोडणारा रेल्वेलाईनवरील पुलाचे बांधकाम, फुगेवाडी येथे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पहिल्या शाळेची सुरुवात इत्यादी प्रमुख कामे मागील काळात पुर्णत्वास गेली आहेत.
मी लोकांमध्ये राहून त्यांचे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा जनसंपर्क चांगला आहे. आजवर केलेली कामे, जनतेचा विश्वास आणि महायुतीचा पाठिंबा यावर मी पुन्हा निवडून येईन असा विश्वास आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.