चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

“समाजाला एकसंध ठेवण्याचे काम साहित्य करते!” – श्रीरंग बारणे

Spread the love

नवयुगच्या ‘दिवाळी सांज’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “समाजाला एकसंध ठेवण्याचे काम साहित्य करते!” असे विचार खासदार श्रीरंग बारणे यांनी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे बुधवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी व्यक्त केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित ‘दिवाळी सांज २०२४’ या उपक्रमात ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव लिखित ‘सादगी’ या गझलसंग्रहाचे आणि ‘पवनेचा प्रवाह’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना श्रीरंग बारणे बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच बीना एज्युकेशनल ट्रस्टचे सचिव अकमल खान, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, संचालक प्रा. पी. बी. शिंदे, संपत शिंदे, नंदकुमार मुरडे, रजनी अहेरराव यांची व्यासपीठावर तसेच ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. सोमनाथ सलगर, माधुरी डिसोझा, वंदना इन्नाणी, संजय सिंगलवार, मीना शिंदे, ॲड. अंतरा देशपांडे, प्रकाश ननावरे यांच्यासह साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची याप्रसंगी सभागृहात उपस्थिती होती.

श्रीरंग बारणे पुढे म्हणाले की, “राजकीय विचारसरणी भिन्न असली तरी साहित्य हे सर्वांना एकाच मंचावर एकत्र आणत असते. वाचनासोबत लेखनाची आवड असल्याने मी चार पुस्तकांचे लेखन केले असून लवकरच माझे पाचवे पुस्तक प्रकाशित होणार आहे. उर्दू ही मूळ हिंदुस्थानी भाषा आहे. त्यामधील लेखन हे आव्हानात्मक अन् रंजक असते; परंतु पुस्तक वाचकांची घटती संख्या ही चिंताजनक बाब आहे!” भाऊसाहेब भोईर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “साहित्यिक, कलावंत आणि प्रतिभावंत हे शहराला नावलौकिक मिळवून देण्याचे काम करीत असतात. संवेदना जागृत असलेली व्यक्तीच वेदनांना शब्दरूप देऊ शकते!” असे मत व्यक्त केले. राज अहेरराव यांनी आपल्या मनोगतातून, “साहित्यनिर्मिती आणि पुस्तक प्रकाशन अशा उपक्रमांसाठी साहित्यिकांना शासकीय पातळीवरून आर्थिक पाठबळ मिळायला हवे!” अशी अपेक्षा व्यक्त केली.

उपस्थित असलेल्या सर्व रसिकांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रकाशनापूर्वी, नादवेध या संस्थेच्या माध्यमातून योगेंद्र होळकर, शर्मिला शिंदे, प्रसाद कोठी, नीलेश शिंदे आणि गणेश गायकवाड या कलाकारांनी ‘सादगी’ या संग्रहातील निवडक गझलांचे सुश्राव्य सांगीतिक सादरीकरण करीत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यामध्ये राज अहेरराव यांच्या पाचही गझलांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, मात्र
“कितनी हसीँ थी वो यादे
सारा ज़माना पागल था
वो भी ज़रासी पागल थी
मैं भी ज़रासा पागल था”
या गझलेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अरविंद वाडकर यांनी प्रास्ताविकातून नवयुगच्या बत्तीस वर्षांच्या कालावधीतील उपक्रमांची माहिती दिली. माधुरी विधाटे, शिवाजी शिर्के, अशोक कोठारी, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी ओक यांनी आभार मानले. साहित्य आणि वैचारिक फराळानंतर मिष्टान्नाच्या फराळाने दिवाळी सांज २०२४ या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button