चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान टक्केवारी कमी असलेल्या भागात स्वीप टीमच्या वतीने मतदान जनजागृती
थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी ही प्रत्येक मतदाराची आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारास मत देऊन आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासात हातभार लावावा आणि २० नोव्हेंबर रोजी प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्वीप टीमचे नोडल अधिकारी राजीव घुले यांनी केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी कमी असलेल्या भागात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमच्या वतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आज या टीमद्वारे पवनानगर, रॉजस स्कुल तसेच काळेवाडी येथील भारतमाता चौक या परिसरात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी नागरिकांना मतदानाचे महत्व सांगताना राजीव घुले बोलत होते.
या अभियानावेळी स्वीप टीमचे दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भाट, विजय वाघमारे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या अभियानात तसेच जनजागृती फेरीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी मतदान जनजागृतीचे हॅन्डी हातात धरून मतदार राजा जागा, होत लोकशाहीचा धागा हो..,चला मतदान करूया, देशाची प्रगती घडवूया.., जागरूक नागरिक होऊया, अभिमानाने मतदान करूया.., मतदानासाठी वेळ काढा, आपआपली जबाबदारी पार पाडा अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांनी येत्या २० नोव्हेंबरला १०० टक्के मतदान करण्याची शपथ घेत आपआपल्या परिसरात मतदान जनजागृतीचा प्रसार व प्रचार करण्याची तयारी देखील दर्शविली.