गैरहजर मतदान अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात होणार कडक कारवाई
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया होणार असून पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविदयालय येथे पार पाडले.
हे प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले. दोन्ही सत्रामध्ये संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांचेमार्फत देणेत आले देण्यात आले. या प्रशिक्षणास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, प्रशिक्षण समन्वयक राजेंद्र जावळे, माध्यम समन्वयक विजय भोजने, पोस्टल बॅलेट समन्वय अधिकारी मनोहर जावरानी,मनुष्यबळ व्यवस्थापन समन्वयक श्रीकांत कोळप, शितल वाकडे, सरिता मारणे, अभिजित केंद्रेकर, यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी तसेच मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव म्हणाल्या, मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रीयेसंबंधी असणाऱ्या शंकांचे प्रशिक्षणामुळे निरसन होते. मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या आवश्यक सूचनांची अंमलबजावणी करावी. तसेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर करावी.
“प्रशिक्षणास गैरहजर असणा-या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे विरोधात लोक प्रतिनिधी कायदा १९५१ अन्वये कडक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी आपली जबाबदारी राष्ट्रीय भावनेने तसेच समन्वयाने पार पाडावी”
-अर्चना यादव, निवडणूक निर्णय अधिकारी |
एकुण ५० क्षेत्रिय अधिकारी व १३ मास्टर ट्रेनर यांनी ५०-५० च्या गटाला मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची माहिती तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य कसे पार पाडावे याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे व प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम हाताळणीचे मार्गदर्शन केले. यामध्ये निवडणूक विषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी मतदारांसाठी टपाली मतदान, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र तपासणी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ओळख,
कंट्रोल युनिट, बॅलट युनिट, व्ही व्ही पॅट चे कार्य, मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची उभारणी, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यावर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रांची जोडणी, मॉक पोल (अभिरूप मतदान), मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही आदी बाबींचा समावेश आहे. यावेळी त्यांनी मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या विषद केल्या. मतदान केंद्राध्यक्षांच्या मतदान केंद्र परीसरातील जबाबदाऱ्या, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही आदी बाबींची माहिती देखील त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली.