औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली मतदानाची शपथ
थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंध जिल्हा रुग्णालय येथे मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांना तसेच कर्मचाऱ्यांना ‘मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार’ अशी शपथ देण्यात आली.
२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी राजीव घुले यांच्या अधिपत्याखाली स्वीप कक्षाचे गणेश लिंगडे, अंकुश गायकवाड, प्रिन्स सिंह यांनी औंध जिल्हा रुग्णालय येथील मतदान जनजागृती कार्यक्रम पार पाडला. या मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी औंध रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही अमिषाला बळी न पडता प्रत्येक नागरिकाने निर्भय वातावरणात मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावणे तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावणे गरजेचे आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच मतदान करताना काय करावे आणि काय करू नये याबाबत देखील यावेळी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले.