माती व पाणी अन्नाचे शत्रु ठरत आहेत – विकास दांगट यांचे मत
‘एमआयटी एडीटी’त जागतिक अन्न दिन साजरा
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शेतीप्रधान भारतातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती आता मागे सोडली आहे. हरित क्रांतीनंतर देशातील अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांकडून किटकनाशके व रसायनांच्या वाढलेल्या वापरामुळे मातीची सुपिकता खालावली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे भूजलातील पाणी देखील प्रदुषित होत आहे. ज्याचा परिणाम रोजच्या खाण्यातील अन्नाच्या दर्जावर होतो. ज्यामुळे, सध्या माती व पाणी हे अन्नाचा दर्जा खालाविण्यासाठी मुळ शत्रु ठरत आहेत, असे मत एसव्ही ग्रुपचे चेअरमन व उद्योजक विकास दांगट यांनी मांडले.
ते येथे एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीतर्फे जागतिक अन्न दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, इन विरो केअर लॅबचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ.निलेश अमृतकर, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, प्रभारी प्राचार्य डाॅ.अंजली भोईटे, डाॅ.संगिता फुंडे, डाॅ.सुजाता घोडके, डाॅ.अशोक तोडमल, डाॅ.रिंकू अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डाॅ.अमृतकर म्हणाले, पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे जगातील कुठल्याही डायनिंग टेबलवर एकतरी भारतीय पदार्थ असावा; अशा मोठ्या अन्नक्रांतीसाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी अन्नाच्या विविध प्रकारांवर नवनविन संशोधन होणे, त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे अतिशय आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना, प्रा.डाॅ.सुनिता कराड म्हणाल्या, भारत हा मुख्यतः शेतीप्रधान देश; परंतू, शेतीला जोडधंद्याची जोड देणे आता काळाची गरज आहे. यासह, शेती तसेच अन्नधान्याचा दर्जा वाढविणारी उत्पादने तसेच बी-बियाण्यांच्या संशोधनासाठी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन द्यायला हवे. भविष्याचा विचार करून एकवेळ उत्पन्न थोडे कमी झाले तरी चालेले मात्र, शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
एमआयटी एडीटी विद्यापीठात यंदाचा जागतिक अन्न दिन विद्यार्थ्यांतर्फे विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. ज्यामध्ये, फुड स्टॉल, संशोधन स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन यादी गोष्टींचा समावेश होता. विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ.भोईटे यांनी तर आभार डॉ. सुजाता घोडके यांनी मानले.
विविध मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान
जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने अन्न आणि शेती क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचे एम.एस.स्वामीनाथन चेअरच्या माध्यमातून पुरस्कार देवून एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आला. यात गोव्यातील प्रगतशील शेतकरी चिन्मय तानशिकर, सातारा मेगा फुड पार्कचे उपाध्यक्ष विजय कुमार चोले, वरुण अग्रो प्रोसेसिंग फुड्स नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक मनिषा धात्रक यांचा समावेश होता. याप्रसंगी, तिन्हीही पुरस्कार विजेत्यांनी मनोगते व्यक्त करताना आपल्या आयुष्यातील अनुभवांनी विद्यार्थ्यांना वैचारिकदृष्ठ्या समृद्ध केले.