पिंपरी ते निगडी महामेट्रो मार्गिकाच्या कामास पिंपरी चिंचवड महापालिकेचा हिस्सा अदा करण्याच्या कामास स्थायी समितीची मान्यता
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडी महामेट्रो मार्गिका क्र.अ च्या कामास पिंपरी चिंचवड महापालिकेचा हिस्सा अदा करण्याबाबतच्या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
भारत सरकारच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून पुणे मेट्रो फेज १ च्या कॉरिडोर-१ च्या विस्तारासाठी पीसीएमसी ते निगडी या ४.४१ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी भारत सरकारने अनुदानाच्या स्वरुपात या प्रकल्पासाठी निधी देखील दिला आहे.
सद्यस्थितीत महामेट्रो मार्फत जिओ टेक्नीकल इन्वेस्टीगेशन (Geo Technical Investigation) चे काम जवळजवळ पूर्ण झाले असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलच्या आवारात आणि खंडोबा माळ चौक येथे पायाभरणीचे काम सुरु करण्यात आले आहे. महा मेट्रोने सन २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ८६.६१ कोटी इतकी मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने महापालिकेने सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये ५० कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे. महा मेट्रोच्या मागणीनुसार महापालिकेकडे उपलब्ध तरतुदीमधून ४९ कोटी रुपये महामेट्रोस देण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली.
बैठकीत मंजूर विषय
महापालिकेच्या प्राथमिक शाळा इमारतीची आणि परिसराची तसेच स्वच्छता गृहांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे, महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमींमधील दैनंदिन स्वच्छता, साफसफाई, देखरेख, सुरक्षा, कामगार पुरवणे, विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रम राबविणे आदी विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली.