नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला रतन टाटांचे नाव देण्याची मागणी
उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात भारताची मान जगभरात उंचावणारे देशाचे महान सुपुत्र पद्मभूषण सर रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. संपूर्ण देशाने शोक व्यक्त केला आणि दुखवटा पाळला.
औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये टाटा ग्रुपचा मोलाचा वाटा राहिला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या माध्यमातून शहरात औद्योगिक क्षेत्राला सुरूवात झाली. आज आयटी-ऑटो आणि इंडस्टिअल हब म्हणून शहराची प्रगती होत आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, टाटा ग्रुप आणि रतन टाटा यांच्याप्रति आम्हा पिंपरी-चिंचवडकरांच्या मनामध्ये अपार आदराची भावना आहे. केंद्र सरकारने नुकतेच पुणे- नाशिक महामार्गावर नाशिफ फाटा ते खेड एलिव्हेटेड महामार्गाच्या कामाला मंजुरी दिली आणि सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या एलिव्हेटेड कॅरिडॉरला रतन टाटा यांचे नाव देणे उचित होणार आहे.
शहरातील नाशिफ फाटा ते खेड एलिव्हेटेड महामार्ग हा रेसिडेन्सिअल आणि इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा मोठा दुवा होणार असून, शहराच्या प्रगतीशील वाटचालीला नवा आयाम मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पला ‘‘ रतन टाटा एलिव्हेटेड कॉरिडॉर’’ म्हणून नाव द्यावे. ज्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना स्व. रतन टाटा यांचे सदैव स्मरण राहील, अशी आमची भावना आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.