ताज्या घडामोडीनवरात्री विशेषपिंपरी

सामाजिक क्षेत्रातील कवीमनाची नवदुर्गा – सविता मल्लिकार्जुन इंगळे

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, सूत्रसंचालिका, वार्ताहर आणि स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असे सविताताईंच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. त्यांचा जन्म सोलापूर येथे सौ.रुक्मिणी आणि भगवानराव व्हटकर या दांपत्याच्या घरी झाला. आईवडिलांना शिक्षणाची व वाचनाची आवड असल्याने लेखनवाचनाचे उत्तम संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचे आई-वडील तसेच प्रेमळ आणि शिस्तप्रिय आत्या शैला शिंदे यांनी सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली. दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासोबत हसत खेळत त्यांचे बालपण गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेनेत कार्यरत असलेल्या उमद्या व्यक्तिमत्वाच्या श्री. मल्लिकार्जुन इंगळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतींच्या नौसेनेतील नोकरीमुळे, लग्नानंतर साधारणपणे बारा वर्षे त्या महाराष्ट्राबाहेर राहिल्या. त्यानंतर पतींच्या निगडी मधील बजाज ऑटो कंपनीतील जॉबमुळे बजाज ऑटो कॉलनीमध्ये वास्तव्याला आल्या. उद्योजक मा.राहुल बजाज यांच्या पत्नी, मा. रूपा बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली, कॉलनीमध्ये वनिता मंडळ सुरू होते. त्या मंडळात २००३ मध्ये उपाध्यक्ष व २००४ मध्ये अध्यक्ष म्हणून काम केले. या अंतर्गत मुली व महिलांसाठी योगा, रांगोळी, नृत्य यांचे प्रशिक्षणवर्ग तसेच पाककला स्पर्धा सुरू केल्या. या मंडळात त्यांच्या काव्यलेखन, काव्य सादरीकरण आणि सूत्रसंचालनाला व्यासपीठ लाभले.

यानंतर आकुर्डी येथे राहायला आल्यानंतर तेथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साप्ताहिक चाहूलचे संपादक डॉ. सुरेश बेरी यांच्या ‘चाहूल साहित्य मंच’ यात कार्यरत झाल्या. त्यांनी सविताताईं मधील आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण ओळखून ‘चाहूल महिला मंच’ सुरू केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री विचार जागृती, समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी काम करताना स्त्रीविषयक प्रश्नांचे विविध पैलू समजून घेता आले. आणि सामाजिक काम करण्याची तळमळ निर्माण होऊन त्यासाठी योग्य दिशा लाभली. त्यांच्या कवितांमधून स्त्रियांच्या वास्तव जीवनाचे प्रतिबिंब उमटू लागले. स्त्रियांसाठी प्रबोधनगीते, स्त्री विचारजागृती करणारे लेख त्या साप्ताहिक चाहूल आणि इतर वर्तमानपत्रांमधून लिहू लागल्या. तसेच साहित्यविषयक कार्यक्रमांचे वार्तांकन करू लागल्या.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनाच्या माध्यमातून, पीडित महिलांसाठी त्यांनी काम केले. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणलेल्या तरुणाशी, मुलगी सज्ञान झाल्यावर सत्यशोधक समाज पद्धतीने तिचा विवाह करून देण्यासाठी पुढाकार घेतला. घरगुती हिंसाचार, अत्याचार तसेच सोशल मीडियावरून होणारी महिलांची फसवणूक या संदर्भात महिलांचे समुपदेशन करून त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या.
‘इनरव्हील’ या आंतरराष्ट्रीय महिला क्लबमध्ये आतापर्यंत, दोन वेळा संपादक, दोन वेळा खजिनदार, आंतरराष्ट्रीय सेवा संयोजक, सचिव, उपाध्यक्ष, अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. इनरव्हीलच्या माध्यमातून, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, महिलाश्रम, दिव्यांग, मतिमंद यांच्यासाठी काम केले आहे. तसेच दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा पुरवल्या आहेत.
त्यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून बुधवारपेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती करून त्यांना आरोग्य सुविधा पुरविणे, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी हातभार लावणे अशा प्रकारची मदत केली आहे. कोरोनाच्या काळात पिंपरी चिंचवड मधील साहित्यिकांच्या सहकार्याने, त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचवली आहे. आजतागायत त्या महिलांसाठी काम सुरू आहे.

इतर सामाजिक संस्थांमधून काम करताना त्यांना जाणवले की महिलांसाठी अजून भरीव कार्य करण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. म्हणून महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा आणि समाजातील महिलांसाठी झगडणाऱ्या महिलांची दखल घ्यावी, या उद्देशाने २८ सप्टेंबर २०१७ रोजी नवदुर्गांचा गौरव करून त्यांनी ‘स्वयंसिद्धा प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून एक दिवसीय महिला प्रेरणा संमेलनांचे आयोजन केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘स्वयंसिध्दा पुरस्कार’ प्रदान केले. यामध्ये स्त्रिया आणि पुरोगामी विचार, स्त्रियांचे संविधानातील अधिकार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांमध्ये साहित्यिकांचे योगदान, पत्रकार क्षेत्रातील स्त्रियांची कामगिरी व त्यांना येणारी आव्हाने, सोशल मीडिया काळातील वर्तमानपत्राचे महत्त्व या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन केले.

स्वयंसिद्धा संस्था आणि पिंपरी चिंचवड मधील सामाजिक संस्थांनी मिळून आसिफा बलात्कार प्रकरण याच्या विरोधात कॅण्डल मार्च, तसेच नुकताच बदलापूर येथे शाळेमध्ये, चिमुकलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात, नारी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. तसेच स्वसंरक्षणासाठी शाळेतील मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय नवरात्रीच्या काळात दोन मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना फुले दांपत्याचे जीवनकार्य कळावे आणि प्रेरणा मिळावी यासाठी दाखवण्यात आला. त्याचप्रमाणे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हुंडा प्रथेविरोधी कार्यक्रम, पथनाट्य, कवी संमेलन यांचे आयोजन केले.

स्वयंसिद्धाच्या माध्यमातून केलेल्या कार्यामध्ये, कार्याध्यक्ष दिनेश भोसले, उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, कोषाध्यक्ष वर्षा बालगोपाल आणि सचिव ज्ञानेश्वर भंडारे या सर्वांचा मोलाचा वाटा आहे.
विविध शाळा, संस्था आणि पनवेलमध्ये झालेल्या पत्रकार संमेलनामध्ये स्त्री विचारजागृती, स्त्री सक्षमीकरण अशा विषयांवर व्याख्याने दिली आहेत. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
या अतिशय तडफदार सामाजिक कार्यकर्तीमध्ये संवेदनशील कवयित्री अंतर्भूत आहे. त्यांचे ‘उष:काल’ व ‘कविता स्त्री वेदनेच्या’ हे दोन प्रातिनिधिक आणि ‘चाकोरीतल्या जगण्यामधून’ हा स्त्री जाणिवेचा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला विविध पुरस्कार लाभले आहेत. स्त्री विचारजागृती करणारी लेखिका म्हणून तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात आणि उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.

त्यांच्या कार्याचा गौरव विविध संस्थांनी केला आहे. त्यांचा बजाज ग्रुप तर्फे तसेच मा. केंद्रीय गृहमंत्री मा.सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि समरसता साहित्य परिषदेतर्फे सामाजिक कार्यासाठी सत्कार करण्यात आला.शांतीदूत परिवार पुणे या संस्थेतर्फे समाजरत्न , काव्यमित्र या संस्थेतर्फे आदर्श व्यक्तीमत्व , राष्ट्रीय शिक्षक संचेतना उज्जैन, तर्फे सावित्रीबाई फुले मातृशक्ती सन्मान आणि ‘माँ गीतादेवी’ स्मृती सन्मान, नवदुर्गा , शब्दधन काव्यमंचचा छावा , शिवांजली साहित्यपीठचा शिवांजली साहित्यरत्न, साप्ताहिक भगवे वादळ तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , हिंदी साहित्य संस्थेतर्फे अहिल्याबाई होळकर , सुशील विचारधारा सोलापूर या संस्थेतर्फे साहित्य गुणवंत अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रात कार्य करताना त्यांचे पती श्री.मल्लिकार्जुन यांचा तसेच स्नेहा व ओंकार या मुलांचा भक्कम पाठिंबा आणि प्रोत्साहन त्यांना लाभले. सासर माहेरच्या सर्व कुटुंबियांनी कायमच त्यांना प्रोत्साहन दिले याबद्दल त्या कृतज्ञता भावना व्यक्त करतात.

स्त्रीमध्ये विविध कलागुण, ऊर्जा, संघटन व व्यवस्थापन कौशल्य असल्याने ती एकाच वेळी अनेक गोष्टी यशस्वीपणे करू शकते. संघर्ष असले तरी आपली क्षमता आणि बुद्धिमत्तेने ते हाताळून आपले उद्दिष्ट तिने साध्य करायला पाहिजे असे त्या सांगतात.
या चैतन्यदायी, ऊर्जाशील, तेजस्वीनी स्वयंसिद्धेचे हार्दिक अभिनंदन. विविध क्षेत्रात भरारी घेण्यासाठी आणि निरामय आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

लेखन – माधुरी शिवाजी विधाटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button