ताज्या घडामोडीपिंपरीपुणे

वकिलांनी संवेदनशीलता जोपासावी! – ॲड. प्रकाश साळशिंगीकर

Spread the love
पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – “व्यवसाय करताना पैसा कमावणे अपेक्षित आहेच; परंतु वकिलांनी त्याचबरोबर माणुसकी ठेवून गरीब, निष्पाप आणि अल्पवयीन आरोपींना न्याय मिळवून देताना संवेदनशीलता जोपासावी!” असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ आणि दर्द से हमदर्द तक या संस्थेचे संस्थापक ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी पुण्यात  केले.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद – विधी प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि दर्द से हमदर्द तक ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौटुंबिक समुपदेशन व बालगुन्हेगार’ या विषयावरील अभ्यासवर्गात वकील आणि कार्यकर्ते यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश साळशिंगीकर बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक ॲड. प्रशांत यादव, ज्येष्ठ विधिज्ञा ॲड. भाग्यश्री अलाटे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, धनंजय गायकवाड, प्रिया रसाळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. प्रकाश साळशिंगीकर पुढे म्हणाले की, “इंटरनेटच्या मोहजालात अल्पवयीन मुले लैंगिकतेकडे आकर्षित होऊन बालगुन्हेगारीला प्रवृत्त होतात. तसेच अठरा वर्षांची मुलगी आणि एकवीस वर्षे वयाचा मुलगा आर्थिक आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ नसतात. त्यामुळे ते पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकू शकतात. त्यामुळे प्रेमविवाहाबाबत वकिलांनी योग्य सल्ला द्यावा. बालगुन्हेगारीचे खटले जुव्हनाइल (अल्पवयीन) जस्टिस ॲक्टच्या तरतुदीनुसार चालवले जातात. खळबळजनक खटल्यांमध्ये वकील म्हणून काम करताना प्रसारमाध्यमांच्या प्रभावापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. बालगुन्हेगार कायद्यातील सवलतींचा लाभ निष्पाप आणि आर्थिकदृष्ट्या गरीब बालगुन्हेगारांना मिळवून द्यावा. योग्य वेळी समुपदेशन मिळाले तर बालगुन्हेगारांमध्ये सुधारणा होऊ शकते, असा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. दर्द से हमदर्द तक ही संस्था निर्दोष, निष्पाप, गरीब आरोपींना तसेच वकिलांना कायदेशीर साहाय्य अन् मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर आहे!”
किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविकातून विश्व हिंदू परिषदेच्या सर्वंकष कार्याची माहिती दिली. ॲड. सतिश गोरडे यांनी, “दर्द से हमदर्द तक या संस्थेमार्फत जे अभ्यासवर्ग घेतले जातात त्याचा लाभ गेल्या दीड वर्षांपासून अनेक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. आजतागायत आपण सुमारे एक लाख ऐंशी हजार गोवंश वाचवले आहेत; तसेच लव जिहादची अनेक प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत. कुटुंबव्यवस्था टिकून राहावी यासाठी विश्व हिंदू परिषद संचलित श्रीराम जानकी कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून दर तीन महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासवर्ग आयोजित केले जातील!” अशी माहिती दिली. ॲड. प्रशांत यादव यांनी, “समाजातील सज्जनशक्ती आणि दुर्जनशक्ती ओळखून दक्ष राहिले पाहिजे; तसेच पूर्ण निर्धाराने हिंदुत्वशक्तीला पाठबळ दिले पाहिजे!” असे आवाहन केले. प्रिया रसाळ यांनी मातृशक्ती आयामाची माहिती दिली. ॲड. भाग्यश्री अलाटे यांनी, “थोडी जागरुकता दाखवून अन् संघटित होऊन अनेक विधायक कामे आपण करू शकतो!” असा विश्वास व्यक्त केला.
ॲड. संकेत राव यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सोहम यादव यांनी आभार मानले. कार्यकमाच्या संयोजनात ॲड. ऋषी शर्मा, ॲड. आशिष गोरडे, ॲड. मंगेश नढे, ॲड. राजेश्वरी रणपिसे, ॲड. महेश सोनवणे यांनी सहकार्य केले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button