महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सांप्रदायाची पार्श्वभूमी लाभलेले पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून नावारूपास आले. या शहराचे विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल पडत असून कटिबद्ध जनहिताय हे ब्रीदवाक्य असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा स्थापना दिवस दि. ११ ऑक्टोबर रोजी जल्लोषात साजरा होत आहे. यानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना दि. ११ ऑक्टोबर १९८२ रोजी झाली. येत्या शुक्रवारी महापालिकेला ४२ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थापनादिनी येत्या शुक्रवारी सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ होईल.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे. खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर आणि महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची देखील उपस्थिती असले.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील प्रांगणात दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होईल. त्यानंतर महापालिका अधिकारी कर्मचा-यांसाठी रस्सीखेच आणि संगीत खुर्ची या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला कर्मचा-यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात येईल.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी २ वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता महापालिकेचे अधिकारी कर्मचारी प्रस्तुत गीत गायनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, पत्रकार आणि महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा होणार आहे. शिवाय नेमबाजी, रायफल शूटिंग अशा विविध स्पर्धा देखील घेण्यात येत आहे. महापालिका मुख्यालयात महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा देखील घेतल्या जात आहेत.