ताज्या घडामोडीपिंपरी

एमआयटी एडीटी- ओकायामा प्रेफेक्चर यांच्यात सामंजस्य करार

Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ पुणे व जपानमधील ओकायामा प्रीफेक्चरमधील स्पेशलाइज्ड कॉलेजेसचे असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला आहे. भारत आणि जपान या दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.  एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश टी. कराड, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. अनंत चक्रदेव आणि ओकायामा स्पेशलाइज्ड कॉलेजेसच्या असोसिएशनचे समन्वयक तनाका जुनिची यांनी करारावर स्वाक्षरी केली.

ही भागीदारी ओकायामा प्रीफेक्चर आणि एमआयटी एडीटीयु च्या संबंधित महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या देवाण घेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी, परदेशातील प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या विकासास सुलभ करण्यासाठी, दोन क्षेत्रांमधील कौशल्य-आधारित कार्यक्रमांमध्ये सहयोगी उपक्रमांसाठी उपयोगी ठरणार आहे.

यावेळी आलेल्या या जपानी पाहुण्यांचे स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील, कुलगुरूंचे सल्लागार शिवशरण माळी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या कराराविषयी बोलताना प्रा. डॉ. चक्रदेव म्हणाले, हा करार एक महत्त्वाचे पाऊल आहे. ज्यामुळे, जागतिकीकरण, शिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तर, आम्ही आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी या भागीदारीतील संभाव्यतेबद्दल उत्साहित आहोत, असा आशावाद तानाका जुनिची यांनी व्यक्त केला.

जुनिची यांच्यासह तेत्सुओ ताडोकोरो, इनू शिनिची, मितानिहारा त्सुनेयोशी, शिहो मियाजिमा, नबिन सुबेदी, प्रा.पल्लवी डांगे, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. अशोक घुगे, प्रा. वृषाली गोडबोले, प्रा. सुषमा पवार या सर्वांनी कराराच्या अटींची अंमलबजावणी करण्याची वचनबद्धता दर्शवून या कार्यक्रमाला हजेरी लावली. डॉ. पाटील यांनी सर्वांचे आभार मानून हा करार योग्य रीतीने राबवला जाईल असे आश्वासन कार्यक्रमाची सांगता करताना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button