महापालिकेच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही यंत्रणेची वार्षिक तत्वावर देखभाल दुरुस्ती करण्याच्या विषयास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या नगररचना व विकास विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा सुविधांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले असून या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील तसेच महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे शहर असून गेल्या २० वर्षात शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. महाराष्ट्र शासनाची एकत्रितकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (युडीसीपीआर-२०२०) नवीन नागरी सुविधा सेवांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यानुसार नगररचना व विकास विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा सुविधांबाबतच्या सेवा शुल्कामध्ये सुधारणा करणे व नवीन सेवा आणि सेवांसाठीचा दर निश्चित करणे आवश्यक होते. तसेच पिपंरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नागरी सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण येत असल्याने महापालिकेच्या महसुलात वाढ होण्यासाठी या सुधारित शुल्काबाबतच्या २३ सेवा व त्यांचे दर निश्चितीच्या विषयाला प्रशासक सिंह यांनी आज मान्यता दिली.
बैठकीत मंजूर विषय
महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी एक फ्लड रेस्क्यू व्हॅन खरेदी करणे, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या तीन वर्षातील एकेरी पद्धतीने तयार केलेल्या वार्षिक लेख्यांना मान्यता देणे, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच महापालिकेच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही यंत्रणेची वार्षिक तत्वावर देखभाल दुरुस्ती करणे आदी विषयांना प्रशासक सिंह यांनी आज मान्यता दिली.














