युवकांनी नाविन्याचा ध्यास अंगीकारावा – इंसिंग्सचे संस्थापक मोहन नायर
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मध्ये एमबीए 2024-25 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या इंडक्शन प्रोग्राम चे उद्घाटन इंसिंग्सचे संस्थापक मोहन नायर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावरती एक्सएड कंपनीचे संचालक आशिष दुबे, कार्पोरेट ट्रेनर शोजेब निशात, कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, विभाग प्रमुख प्रा.गुरुराज डांगरे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक मोहन नायर पुढे म्हणाले, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध प्रकल्पाचे सादरीकरण संबंधित प्राध्यापकांना वेळेतच करावे, अभ्यास, शिक्षण व वेळेची जाणीव प्रत्येक विद्यार्थाने ठेवून सकारात्मक व गुणवत्तापूर्व कृती करणे महत्वाचे आहे. आपल्यातील कमतरता कोणती आहे याचे वेळीच आत्मपरीक्षण करा. हल्लीच्या युवा वर्ग नैराश्यात जाताना चे चित्र दिसून येत असले तरी इतरांची प्रेरणा घेऊन स्वतःत बदल घडविण्याची क्षमता बाळगली पाहिजे. पदवी घेऊन नोकरी करणार की, व्यवसाय करणार या प्रश्नावर आत्ताच मनकेंद्रित करा. लक्षात ठेवा विचार व नुसत्या चर्चा करून आयुष्यात यशस्वी होता येत नाही. स्पर्धा असली तरी संधी देखील आहे. आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. यासाठी तुम्ही कोणत्या भागातून आला आहात हे महत्त्वाचे नाही. भविष्य छोट्या व्यवसायातून सुरुवात करा नोकरी करणाऱ्यांनी मिळेल, ती नोकरी प्रथम स्वीकारावी अनुभव ग्रहण करून मोठ्या कंपनी जाण्याचे स्वप्न पहावे, असे आवाहन नायर यांनी केले.
एक्सएड कंपनीचे संचालक आशिष दुबे म्हणाले, आपण शैक्षणिक पुस्तके वाचले व सोडले असे होता कामा नये. दैनंदिन अभ्यासक्रमाचे वेळापत्रक ठरवा. घाबरू नका. जाग्रन टाळून पुरेशी झोप महत्वाची आहे. संयम अंगीकारा सतत आनंदी राहा. मनातील क्रोध बाहेर काढा. आळस झटकून टाका. आजचे उद्या करू ही प्रवृत्ती टाळा. समस्या उद्भवली तरी त्याला न घाबरता सामोरे जाण्याचे आवाहन विद्यार्थांना यावेळी केले.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा आपल्या मनोगतात म्हणाले, भावी आयुष्यात विद्यार्थ्यांनो यशस्वी होण्यासाठी प्रथम मनातील चल-बिचलता झटकून टाका. विविध क्षेत्रात संधी आहे. ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात आनंदाने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी तुमच्या अंगी प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी व जिद्द असेल तर तुमची गरिबी देखील तुमच्या यशाच्या आड येत नाही. हे प्रत्येकानी लक्षात ठेवा. यासाठी प्रचंड वाचन, इच्छाशक्ती, तडप तूमच्यात असायला हवी. प्रत्येकात ऊर्जा आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करून स्वतःचे व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची खूणगाठ मनाशी बांधून भविष्यात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करून समाजात, देशाकरिता यशस्वी शिखरावर जावा असा कानमंत्र डॉ. शहा यांनी यावेळी दिला.
यावेळी कार्पोरेट ट्रेनर शोजेब निशात, प्रा. गुरुराज डांगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्ताविकात एमबीएचे संचालक डॉ.सचिन बोरगावे म्हणाले, महाविद्यालय व संस्थाचालक प्रत्येक विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडावे यासाठी कटिबद्ध आहे. एमबीएची दोन वर्ष अत्यंत महत्त्वाची असून तुमचे भावी भवितव्य ठरवणारे हे दोन वर्ष देखील आहे. भविष्यात मी काय होणार याचे आज तुम्ही निश्चय करून, संकल्प करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महिमा सिंग यांनी केले तर आभार प्रा. तुलिका चटर्जी यांनी मानले.