गायन, लेखन आणि अभिनय क्षेत्रातील नवदुर्गा वैजयंती प्रकाश भालेराव -सदाफुले
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सुविद्य भालेराव कुटुंबात ७ नोव्हेंबर १९७९ रोजी जन्मलेल्या वैजयंती भालेराव यांचे शिक्षण मुंबई महानगरीत झाले. त्यांच्या आजी जानकी बाबु भालेराव यांना संगीताची अतिशय आवड होती आणि आवाजही सुरेल होता. दूरदर्शन वरून त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम प्रसारित झाले होते. ते पाहून भारतरत्न लता मंगेशकर यांनी या मंडळाला स्वतःच्या घरी बोलवून त्यांचे कौतुक केले होते. तसेच अरुणा आणि प्रभाकर भालेराव या आई-वडिलांनाही संगीताची आवड होती. त्यामुळे बालवयातच त्यांच्या मनावर संगीत संस्कार झाले.त्यांचे वडिल फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे आहेत. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा मोलाचा विचार मातापित्यांकडून त्यांना लाभला.
याच विचारातून जीवनाला आकार देत असताना पद्मश्री पद्मजा फेणाणी तसेच पंडित शरदजी सुतावणे या नामांकित गुरुवर्यांकडे त्यांनी शिक्षण घेतले.
एसएनडीटी विद्यापीठातून चार वर्षांची सुगम संगीताची पदविका त्यांनी प्राप्त केली आहे.
B. A. Vocal classical music ही पदवी ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठातून घेतली आहे. पिंपरी येथे त्या वास्तव्याला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी, निगडी येथे वीस वर्ष संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच विविध संस्थांमध्ये परीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
‘खजाना’ हा हिंदी गझलगायनाचा कार्यक्रम, ‘साईरंग’ हा साईगीतांचा कार्यक्रम, ‘रिश्ता दिल से दिल तक’ हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आणि ‘आठवणी गदिमांच्या’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम अशा त्यांच्या मनाला मोहिनी घालणाऱ्या सुरेल गायनाने सजलेल्या कार्यक्रमांना रसिकांची भरभरून दाद मिळते.
गायन क्षेत्रासोबतच एकांकिका, नाटक आणि चित्रपट लेखनाची धुरा त्या यशस्वीरित्या सांभाळत आहेत. अनेक मराठी आणि हिंदी गीतांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच विविध नाटकांची शीर्षक गीते गायली आहेत. ‘कभी दूर जाना ना’ आणि ‘मी बाबासाहेबांची लेक’ हे त्यांचे अल्बम प्रकाशित आहेत. तसेच ‘झाले रे तुझी झाले’ हा अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. रसिकांची भरभरून दाद मिळते. त्यांच्या विद्यार्थ्यांचे खूप अल्बम गायक म्हणून नावारूपाला आले आहेत.डोळसपणे वावरताना आजूबाजूच्या परिस्थितीतील अनुभव त्यांच्या संवेदनाशील मनामध्ये झिरपत असतात. त्यांनी लिहिलेल्या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या जीवनावर आधारित ‘अक्का’ या एकांकिकेचे अनेक प्रयोग मिरॅकल अकॅडमीने सादर केले आहेत. लवकरच राज्य नाट्य स्पर्धेमधून हे नाटक येत आहे. ‘राजू द अनटोल्ड स्टोरी’, ‘हा खेळ रात्रीचा’ आणि ‘पश्चाताप’ या लघुपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे. तसेच सोनी मराठीवरील ‘एकविरा आई’ या मालिकेतून त्यांनी केलेला अभिनय रसिकांच्या पसंतीला उतरला आहे. ज्येष्ठ साहित्यिक मा. बबन पोतदार यांच्या कथेवर आधारित आणि मंगेश दळवी दिग्दर्शित ‘वळण’ नावाचे दोन अंकी नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात त्या मुख्य भूमिका करत आहेत.
अभिनेते शाम मोहिते संचलित
स्वामी समर्थ ॲक्टींग स्कूल व स्टुडिओ, निगडी येथे त्या अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी सेमिनार आणि क्लासेस घेतात.
विविध क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय माय मराठी कवी संमेलन सन्मानचिन्ह, राज्यस्तरीय अश्वघोष कलासक्त पुरस्कार, सिद्धी फाउंडेशन पुणे यांचा पुरस्कार, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज तर्फे सन्मानचिन्ह, आर्टिस्ट वेल्फेअर असोसिएशन तर्फे सन्मानचिन्ह, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, पुणे यांच्या तर्फे गायनासाठी पुरस्कार, FORZA जनसेवा प्रतिष्ठान तर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार, महाराष्ट्र बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे पुरस्कार, भारत सरकार दिल्ली यांचा युवागौरव पुरस्कार, डॉ .वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन तर्फे पुरस्कार, मातोश्री प्रतिष्ठान गुणगौरव पुरस्कार, कलारंग संस्थेचा कलागौरव पुरस्कार, वंदे मातरम संघटना,पुणे यांचा गांधी शांती अहिंसा राष्ट्रीय पुरस्कार, काव्यमित्र संस्थेचा राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
गायिका, लेखिका आणि अभिनेत्री असा त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला आहे. ह्या तिन्ही आवडीच्या क्षेत्रात समरसून काम करताना त्यांना त्यांचे पती प्रकाश सदाफुले, सासर आणि माहेरचे कुटुंबीय आणि मुलांचा प्रेमळ पाठिंबा लाभला आहे. एखादी स्त्री जेव्हा तिच्या आवडीच्या क्षेत्रात काही करू पाहते तेव्हा तिच्यासोबत तिचे कुटुंब असले की तिच्या पंखात अजून बळ येते असे त्यांना वाटते.
त्यांनी या तिन्ही क्षेत्रात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आणि त्यांच्या सर्व स्वप्नांच्या पूर्तीसाठी खूप शुभेच्छा.
लेखन- माधुरी शिवाजी विधाटे