ताज्या घडामोडीनवरात्री विशेष

वेध पिंपरी चिंचवड मधील नवदुर्गां – महिलांमध्ये मराठीतील पहिल्या ‘दीवान ए मीना’ या दीवानच्या मानकरी गझलकार आणि कवयित्री – मीना शिंदे

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- दुसऱ्या नवदुर्गा आहेत.अहमदनगर येथील मीना शिंदे.

आपली माहिती देताना त्या सांगतात, मी मीना संजय शिंदे एम.ए .बीलीब पदवीधर ग्रंथालय शास्त्र  आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे २४ जुलै १९६३ रोजी जन्मलेल्या मीना शिंदे यांना बालपणापासूनच वडिलांकडून वाचनाचे बाळकडू लाभले. लग्नानंतर विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत उच्च शिक्षण घेऊन त्या भारतीय जैन संघटना संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर पिंपरी, पुणे येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत झाल्या. समृद्ध साहित्य वाचनसंस्कारातून त्यांनी भावभावनांचे प्रकटीकरण काव्य लेखनातून करायला सुरुवात केली. अंतरंगातून उमटलेल्या काव्यरूपी हुंकाराला विविध मान्यवर साहित्यिकांचे मार्गदर्शन आणि रसिकमान्यता लाभली.

बंधुताचार्य  प्रकाश रोकडे यांच्या मार्गदर्शनामुळे त्या बंधुताच्या विविध कार्यक्रमाचे सहजसुंदर सूत्रसंचालन करू लागल्या. तसेच बंधुता संस्थेमध्ये विविध पदांवरून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. ज्येष्ठ गझलकार  म.भा चव्हाण यांनी गझललेखनासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित गझल कार्यशाळेत ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार मा. राज अहेरराव यांचे गझल लेखनासाठी मार्गदर्शन लाभले. याच दरम्यान ‘स्पंदन’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. गझल प्रांतात रुची उत्पन्न झाल्यामुळे भावगर्भ गझल लेखनास प्रारंभ केला. ज्येष्ठ गझलकार मा.इलाही जमादार यांचे मार्गदर्शन लाभून ‘हृदगत्’ हा त्यांचा पहिला गझल संग्रह साकारला.

पाठोपाठ ‘गझल रुपेरी’ ही पहिली गझलसीडी प्रकाशित होऊन आकाशवाणीवर यातील गझला प्रसारित होऊ लागल्या. ‘गझल रुपेरी’ या गझलने एअरटेलची रिंगटोन म्हणून स्थान मिळवले.
गझल लेखन आनंदाने चालू असताना ब्लड कॅन्सरने त्यांच्या जीवनात शिरकाव केला. पण सुयोग्य औषधोपचार, जीवनावरचा अदम्य विश्वास, कुटुंबीयांची समंजस साथ या जोरावर त्यांनी या दुर्धर आजाराशी लढायला सुरूवात केली. या खडतर काळात त्यांच्या गझल या जीवनसंगिनीने त्यांना मोलाची साथ दिली. कविता आणि गझल लेखनातून त्यांना मानसिक आधार लाभला.

नंतर अनिल कांबळे यांच्या प्रेरणा आर्ट फाउंडेशनच्या सहयोगाने ‘कातर वेळी’ या सीडीचा जन्म होऊन रसिकांची भरभरून दाद लाभली. यानंतर गझलपुष्प, गझल मंथन या संस्थेतून गझल लेखनाला गती मिळाली‌. गझलपुष्पचे सदस्य मा. प्रशांत पोरे यांनी ‘प्रशांत ए दीवान ‘ हा त्यांचा मराठीतील पहिला दीवान प्रकाशित केला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गझल पुष्पच्या सहयोगाने महिला गझलकारांमधील पहिला दीवान ‘दीवान – ए – मीना’ या गझल संग्रहाला ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांची प्रस्तावना लाभून त्यांच्याच हस्ते प्रकाशन झाले. आणि ‘दीवान – ए – मीना’ हा मराठी गझलेतील दुसरा मुकम्मल दीवान आणि महिला गझलकारांमधील पहिला दीवान प्रकाशित करण्याचे गझल प्रांतातील अतिशय मोलाचे कार्य त्यांनी केले.

दीवान ही उर्दू शायरी मधील संकल्पना असून दीवानच्या पुढे गझलकाराचे नाव घेतात.
मराठी भाषेतील सगळ्या मुळाक्षरांच्या ( ङ ञ सोडून ) रदीफ असलेल्या गझलांचा संग्रह म्हणजे दीवान. यातील गझलांना काफीया आणि रदीफ असलेच पाहिजेत असा नियम आहे. तसेच रदीफचे शेवटचे अक्षर मराठी वर्णमालेतील दीर्घ उच्चार होणारी मुळाक्षरे असणाऱ्या किमान ३६ गझला हव्यात असा नियम आहे. ‘दीवान-ए-मीना’ मध्ये अशा तब्बल १७१ गझला आहेत. या दीवानची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली आहे. प्रचलित आणि अप्रचलित वृत्तात बांधलेल्या, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आणि भाव उत्कटतेचा परिपोष करणाऱ्या या रचना मन वेधून घेतात. त्यांच्या गझलांमधून भक्तीरस तसेच मानवी भावभावना प्रेम, विरह,व्यथा, वेदना, तर आहेतच शिवाय सामाजिक भान ही दिसून येते. म्हणूनच या गझल रसिक मनाचा ठाव घेतात.
कोहिनूर ए इलाही पुरस्कार, शब्दधन काव्यमंचचा गझल सम्राट सुरेश भट पुरस्कार,
स्वानंद महिला संस्था पिंपरी चिंचवड श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स, दिल्लीचा काव्यदीप पुरस्कार, मृत्युंजय काव्य पुरस्कार .
समरसता साहित्य पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार , पिंपरी चिंचवड साहित्य परिषद जागतिक महिलादिन साहित्य क्षेत्रातील विशेष महिला पुरस्कार या व अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन वर त्यांनी सादरीकरण केले आहे.
काव्यशिल्प, गझल रूपेरी हे युट्युबवर आहे.
बंधुता, गझलपुष्प, दिलासा, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड साहित्य मंच, साहित्यप्रेमी, रंगतसंगत, साहित्यदीप, करम, काव्यशिल्पी, गझलमंथन अशा विविध साहित्यिक संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत. या सर्व प्रवासात त्यांना त्यांचे पती संजय शिंदे आणि कुटुंबीय आणि स्नेहीजनांची मोलाची साथ लाभली आहे.
गझल प्रांतातील हे हसरे, खेळकर, गझलेला समर्पित असे अभ्यासू , जुनेजाणते, उत्साही, ऊर्जाशील व्यक्तिमत्व आहे. आणि ‘दीवान ए मीना’ या दर्जेदार दीवानच्या निर्मितीमुळे या क्षेत्रातील नवोदित, अभ्यासक आणि रसिकांसाठी एक आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला आहे. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या सर्व साहित्यिक कार्याला आणि जीवन प्रवासाला मनापासून शुभेच्छा.

लेखन- माधुरी शिवाजी विधाटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button