ताज्या घडामोडीपिंपरी

महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छतेची पैठणी’ या कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वच्छतादुतांमुळे शहर स्वच्छ राहते त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते तसेच महिला स्वच्छता कर्मचारी देखील स्वतःचे घर उत्तमरित्या सांभाळून शहराच्या स्वच्छतेमध्ये आपले योगदान देत असतात.  त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छतेची पैठणी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वच्छतादुतांसाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारी पिंपरी चिंचवड महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली असल्याचे प्रतिपादन आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी केले.

महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘स्वच्छतेची पैठणी. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे,  सहाय्यक आरोग्याधिकारी  सुधीर वाघमारे,  शांताराम माने, अंकुश झिटे, के. पी. एम. जी. संस्थेचे विनायक पद्मणे यांच्यासह  महिला आरोग्य कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे म्हणाले, ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत महापालिकेच्या वतीने  आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाने शहरात स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे   पोहचवण्यास मदत होत असून  पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबत जनजागृती देखील करण्यात येत आहे. तसेच  सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छ सांस्कृतिक उत्सव आदी उपक्रमांचेही  आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छता कर्मचारी ३६५ दिवस शहराची स्वच्छता करत असतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा तसेच दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त  त्यांना विरंगुळा मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीने अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन  केले आहे. स्वच्छता कर्मचारी महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आणि निखळ आनंद घ्यावा हा महापालिकेचा  उद्देश असल्याचे येळे यांनी सांगितले.

सूत्रसंचालक आर.जे. अक्षय यांनी स्वच्छतेची पैठणी या कार्यक्रमांतर्गत स्वच्छता कर्मचारी महिलांचे विविध खेळ घेऊन उपस्थित महिलांचे मनोरंजन केले.  महिलांनी देखील या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला. मंगल जाधव ही महिला प्रथम क्रमांक पटकावत पैठणीची मानकरी ठरली. नेहा रंगवणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावत सोन्याची नथ जिंकली तर सुशिला गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळवून  चांदीची जोडवी जिंकली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button