“कर्मवीर भाऊराव पाटील हे सत्यशोधकी विचारांचे कृतिशील उद्गाते” – डॉ. एस.एन.पठाण
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “रयत शिक्षण संस्थेची स्थापना ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सत्यशोधक समाजाच्या परिषदेत झाली असून कर्मवीर भाऊराव पाटील हे सत्यशोधकी विचारांचे कृतिशील उद्गाते आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर चे माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. एस.एन. पठाण यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी,पुणे येथील महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३७ व्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कर्मवीर अण्णांनी सुरु केलेली ‘कमवा व शिका योजना’ बहुजनांसाठी जीवनदायी ठरली, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. संजोगजी वाघेरे पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची महती आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान यावर प्रकाश टाकला. महात्मा फुले महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय-धोरणांनुसार कार्यरत आहे असे सांगून या महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनात ३.६१ सी.जी.पी.ए सह A++ ग्रेड मिळाल्याबद्दल त्यांनी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी विविध उदाहरणे देऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या प्रसंगी महात्मा फुले महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.तसेच गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय विज्ञान विभाग प्रमुख प्रोफेसर (डॉ.) संगीता अहिवळे यांनी करून दिला. नवमहाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य मा. दत्तात्रय गाढवे यांनी उपस्थितांप्रती आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी आणि सौ. मीनल साकोरे यांनी केले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य डॉ. दत्तात्रय हिंगणे, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय यांच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन भाऊसाहेब वाघेरे-पाटील, तसेच स्कूल कमिटीचे सदस्य हनुमंत नेवाळे, पश्चिम विभाग सल्लागार सदस्य सुदाम शिंदे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उर्मिला पाटील, सामाजिक प्रबोधनकार शारदा मुंढे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते संजय गायके,कार्यालय प्रमुख रत्नप्रभा नाईक आदी उपस्थित होते.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सप्ताहानिमित्त सांस्कृतिक समितीच्या वतीने निबंध लेखन, भित्तीचित्र, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजूषा इ.विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याबाबत ७७ प्राध्यापकांनी महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच कन्या विद्यालय, पिंपरी येथे जाऊन व्याख्यान दिले.राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी.व जिमखाना विभाग यांच्या वतीने कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.त्यात ४६ जणांनी रक्तदान केले. कर्मवीर जयंती दिनी भव्य मिरवणूक काढण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील चित्ररथाच्या मिरवणूकीच्या अग्रभागी विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाचे नियोजन करण्यात आले.
उषा संजोग वाघेरे-पाटील, श्री. नेवाळे यांनी कर्मवीर प्रतिमेचे पूजन करून पिंपरी गावात कर्मवीर चित्ररथाचे स्वागत केले. यामध्ये महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि कन्या विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग अतिशय उत्साहात सहभागी झाले.