महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर
बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्यात मजले बांधण्यावर लक्ष केंद्रित करणार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून आतापर्यंत या इमारत बांधकामाचे महत्वाचे टप्पे गाठले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हेतू सर्व महापालिका कार्यालयांना एकाच छताखाली केंद्रित करणे, नागरिकांना अधिकाधिक सेवा अधिक सुलभ पद्धतीने पुरविणे आणि एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करणे हा आहे.
इमारत उभारण्यासाठीचे खोदकाम, पाया आणि तळघराच्या पातळीचे काम पूर्ण झाले असून आता सध्या तळमजला बांधण्याचे काम सुरू आहे. इमारतीचे काम पुर्ण झाल्यावर नवीन सुविधांमध्ये नागरिक सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल आणि ई-गव्हर्नन्स केंद्र यांसारख्या सार्वजनिक सुविधांचा समावेश असणार आहे, ज्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या अधिकाधिक सेवा एकाच छताखाली उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. तसेच यामध्ये मेळावे, प्रदर्शने आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठीही भव्य जागा उपलब्ध असणार आहे.
८.६५ एकरच्या विस्तृत भूखंडावर वसलेली ही इमारत नागरिकांना विविध आधुनिक सेवा तर प्रदान करेलच पण शाश्वत विकासासाठी महापालिकेच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणूनही उभी राहील. तसेच ग्रीन बिल्डींगनुसार या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून इमारतीस गृह (ग्रीन रेटिंग फॉर इंटग्रेटेड हॅबिटेट असेसमेंट) परिषदेचे ५ स्टार मानांकन आणि इंडियन ग्रीन बिल्डींग काऊंसिलचे (आयजीबीसी) प्लॅटिनम मानांकन मिळविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. यासोबतच सोलर पॅनेल, पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा आणि ग्रीन स्पेसेस यांसारख्या वैशिष्ट्यांसह परिपुर्ण असलेल्या या इमारतीची संरचना नागरिक तसेच कर्मचाऱ्यांसाठी पर्यावरणपूरक आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे ठेकेदार के.एम.व्ही प्रोजेक्ट्स लि. हैदराबाद हे असून सुनिल पाटील असोसिएट्स प्रा.लि हे वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत केवळ कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेतच वाढ करणार नाही तर महत्त्वाच्या सेवांमध्ये नागरिकांचा प्रवेश देखील निश्चित करेल. याद्वारे नागरिकांसाठी सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या विविध सेवांच्या विस्तृत सोयीसह जनतेसाठी अखंड सेवा प्रदान करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
चौकट – पुढील टप्प्यात इमारतीचे मजले बांधण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार
खोदकाम, पाया उभारणी आणि तळघराचे काम पुर्ण झाल्यानंतर पुढील टप्पात इमारतीचे मजले बांधण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नवीन इमारत भविष्यात पिंपरी चिंचवडमधील एक महत्वाचे स्थळ म्हणून उदयास येईल आणि नागरिकांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा देण्यासाठी कार्यक्षम प्रशासन म्हणून काम करेल.
चौकट
नवीन प्रशासकीय इमारतीची प्रमुख वैशिष्ट्ये:
प्रकल्प खर्च:- ३१२ कोटी रूपये (मान्य झालेली निविदा रक्कम – २८६ कोटी रुपये)
ग्रीन बिल्डींग सर्टिफिकेट – गृह (ग्रीन रेटिंग फॉर इंटग्रेटेड हॅबिटेट असेसमेंट) परिषदेचे ५ स्टार मानांकन आणि इंडियन ग्रीन बिल्डींग काऊंसिलचे (आयजीबीसी) प्लॅटिनम मानांकन मिळविण्यावर भर
प्रकल्प क्षेत्र:- ९१,४५९ चौरस मीटर बांधकाम क्षेत्रासह ८.६५ एकर भूखंड
पर्यावरणपूरक सुविधा:- सौर ऊर्जेचा वापर, पाण्याचा पुनर्वापर आणि ग्रीन स्पेसेस
इमारतीची रचना:- प्रत्येकी ३ तळघरांसह ६ ते १८ मजल्यापर्यंतचे ३ विभाग
आधुनिक सुविधा:- नागरिक सेवा केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, ई-गव्हर्नन्स केंद्र, ग्रंथालय, दवाखाना आणि बरेच काही
प्रकल्पाची मुदत:- जानेवारी २०२३ पासून ३६ महिने (खोदकाम आणि तळघराचे काम पुर्ण झाले आहे)
चौकट
तळमजल्यावरील सुविधा –
वाचनालय :- १२५ चौ.मी
प्रदर्शन हॉल/संग्रहालय :- ३८० चौ.मी
बहुउद्देशीय हॉल :- ५७० चौ.मी
महापालिका सभागृह :- १८६५ चौ.मी (आसन क्षमता – ४६२)
वाचन, सांस्कृतिक प्रदर्शन आणि सामुदायिक कार्यक्रमांसाठी तळमजल्यावर विविध सुविधा देण्यात येणार आहेत, ज्यामुळे प्रशासकीय कामकाजासह सार्वजनिक सहभाग वाढविण्यावरही भर दिला गेला आहे.