शहरात विविध ठिकाणी बॉलीवूड पार्क आणि वर्ल्ड पार्क विकसित करण्याच्या विषयास स्थायी समितीची मान्यता
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गायरान येथे बायोडायव्हर्सिटी पार्क तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती निर्मिती करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी बॉलीवूड पार्क आणि वर्ल्ड पार्क विकसित करण्यात येणार आहे. या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात आज महापालिका स्थायी समिती बैठक पार पडली. यावेळी महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी प्रशासक सिंह यांनी विविध विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
तळवडे गायरान येथे सुमारे ६० एकर जागेत बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. जैवविविधतेचे संवर्धन ही एक सामुहिक जबाबदारी असून जैवविविधतेचे संवर्धन करणे, शहरीकरण विस्ताराबरोबर वन्य परिसराचे संवर्धन करणे, वन्य पशु पक्षांचे संवर्धन करणे, जैवविविधतेसंबंधी शिक्षण देणे आदी संकल्पनांचा यामध्ये समावेश असणार आहे. यामुळे संशोधन, शिक्षण, मनोरंजन तसेच पर्यटन आदी बाबींना अधिक चालना मिळणार आहे. या बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये विविध प्रकारचे थीम पार्क उभारण्यात येणार असून खुले प्रेक्षागार (एम्पिथिएटर), जैवविविधता प्रबोधन केंद्र, कार्यशाळा, उपहारगृह, लहान मुलांचे उद्यान आदी बाबी या पार्कमध्ये उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशस्त पार्किंग देखील तयार करण्यात येणार आहे. सायकल आणि गोल्फ ट्रॅक तयार करण्यात येणार असून पादचारी मार्ग देखील तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा असणारे बायोडायव्हर्सिटी पार्क पिंपरी चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे, अशी माहिती सह शहर अभियंता मनोज सेठिया यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृतींची (वेस्ट टू वंडर) निर्मिती करून वर्ल्ड पार्क आणि बॉलीवूड पार्क विकसित करण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या सौदर्यात आणि नावलौकिकात भर पडणार असून ‘रिड्यूस, रियुज अँड रिसायकल’ या त्रिसूत्रीवर आधारित टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून हे पार्क विकसित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने “वेस्ट टू वंडर” मॉडेल हे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक ठरणार असून हा अभिनव उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय ठरेल. तसेच या उपक्रमामुळे दैनंदिन जीवनात वापरात येत असलेल्या पुनर्वापरायोग्य वस्तूंचा पुनर्वापर होऊन नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन होण्यास मदत होईल. प्लास्टिक किंवा अविघटनशील पदार्थ अथवा वस्तूंचा पुनर्वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन यामुळे महापालिकेच्या महसुलातही वाढ होणार आहे.
निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून मुंबई पुणे हायवे लगत दापोडी पर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. तसेच महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते दुसरीच्या वर्गासाठी इंग्रजी प्रॅक्टिकल पुस्तक छपाई करणे, आर्थिक नियोजनासाठी वित्तीय उपाययोजना आणि वित्तीय धोरण निश्चित करणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वापरासाठी ९ वाहने खरेदी करणे, प्रभाग क्रमांक २६ कावेरीनगर कस्पटेवस्ती परिसरात पावसाळी पाण्याची लाईन टाकणे आणि स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्याच्या विषयास आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या ताथवडे गावातून जीवननगर मार्गे एमटीयू कंपनीकडे जाणारा १८ मीटर डीपी रस्ता विकसित करणे, महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ पुनावळे येथील मुंबई बँगलोर हायवे पासून काटेवस्तीकडे जाणारा ३० मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करणे, महापालिकेच्या पुनावळे येथील कोयतेवस्ती चौक ते जांबे गावाकडे जाणारा १८ मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करण्याच्या विषयास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.