काळेवाडीतील निळ्या पूर रेषेतील बांधकामावरती कारवाई थांबवून नाना काटे यांनी दिला नागरिकांना दिलासा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – काळेवाडी येथील पत्राशेड वरती कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेच्या पथकाला विरोध करून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. आज काळेवाडी येथील बांधकामावरती कारवाई होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संतोष कोकणे यांनी नाना काटे यांना दिली. यानंतर तात्काळ नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई थांबवली, यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पवना नदीला पूर येतो. निळ्या पूर रेषेतील बांधकामावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रम विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. आज काळेवाडी येथील नदीलगत असणाऱ्या स्पाईन रोड लगत बांधकामावरील कारवाई करण्यात येणार होती. यासाठी पिंपरी चिंचवड अतिक्रमण विभागाच्या पथक सर्व यंत्रणासह दाखल झाले. याची माहिती नाना काटे यांना मिळताच त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांची महापालिकेत भेट घेऊन सदरची कारवाई थांबवण्याची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आयुक्तांनी ती कारवाई थांबवली. यामुळे काळेवाडी मधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
चिंचवड विधानसभेतील निळ्या पूर रेषेतील बांधकामावरती कारवाई करू नका
दरवर्षी होणाऱ्या पावसाने पुराचा धोका असल्यामुळे निळ्या पूररेषेतील बांधकामामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. यासाठी पालिकेच्या अतिक्रमण कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. काळेवाडी येथील नदीलगत कारवाई होणार असल्याने माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व स्थानिक नगरसेवक संतोष कोकणे यांनी तातडीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करीत सदर कारवाई तातडीने स्थगित करण्याची मागणी केली. चिंचवड विधानसभेतील नदीलगत निळ्या पूररेषेत असलेल्या लाखो नागरिकांना या कारवाईचा फटका बसणार आहे. या सर्वसामान्य नागरिकांच्या घर आणि व्यवसाय यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी नाना काटे यांनी यावेळी केली.