कुणाल आयकॅान रस्ता होणार अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेटं नुसार होणार विकसित, शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागरमधील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक (कुणाल आयकॉन रोड) रस्त्याला आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली आहे. पिंपळे सौदागरमधील वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५५ कोटी रुपये मंजूर करून या प्रकल्पाद्वारे रस्त्यांचे १८ मीटर आणि १२ मीटर रुंदीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचे महापालिकेने मान्यता दिली आहे. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
या प्रकल्पामध्ये इतर आवश्यक सेवांबरोबरच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन पावसाळी वहन नलिका, जलनिस्सारण वाहिनी, पाणीपुरवठा वाहिनी,पथदिवे आणि दिशादर्शक सूचनाफलक आदी सुविधांचाही समावेश असणार आहे. तसेच प्रकल्पासाठी अर्बन ट्रान्सपोर्ट फंड (युटीएफ) द्वारे निधी उपलब्ध करून दिला जाणार असून महापालिकेच्या नागरी प्रकल्प विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. पिंपळे सौदागर परिसरातील वाढती नागरी लोकसंख्या यांच्या अनुषंगाने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून कुणाल आयकॉन रस्त्यावरील होणारी सतत वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
याचीच दखल घेत पालिकेने कुणाल आयकॉन रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्यासाठी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. आणि यामुळे पिंपळे सौदागर मधील सतत होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना खूप दिलासा मिळणार आहे. तसेच पादचारी किंवा वयोवृद्धांसाठी सोयीस्कर तसेच सुरक्षित पदपथाची सुविधा देखील होणार असल्याची माहिती शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे.