हुजरेगिरी करणाऱ्या राजू दुर्गे यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये – राम वाकडकर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मी पक्ष सोडलेला नाही, फक्त पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तो मंजूर करायचा की नाही, हे पक्ष श्रेष्ठींच्या हातात आहे. त्यामुळे राजू दुर्गे यांच्या सारख्या बदनाम व्यक्तींनी हुजरेगिरी करून बक्षीसी मिळविण्याच्या नादात आमच्या चिंचवडच्या राजकारणात स्वःताची पोळी भाजून घेऊ नये. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा राम वाकडकर यांनी दिला आहे.
राम वाकडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे प्रवक्ते राजू दुर्गे यांच्यावर सडकून टीका करत गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ओंकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून राजू दुर्गे यांनी पिंपरी चिंचवड परीसरातील शेकडो गोर-गरीब नागरिकांना ज्यादा व्याजदराचे अमिष दाखवून त्यांना लाखो रूपयांच्या ठेवी ठेवायला लावल्या व त्यांचे पैसे बुडवले. गेल्या वीस वर्षात या गोर-गरीब नागरिकांना व्याज तर सोडाच मुद्दल देखिल व्यवस्थित मिळालेली नाही. पतसंस्थेतीत ठेव ठेवलेल्या नागरिकांनी वारंवार तक्रारी आंदोलन केल्यामुळे राजू दुर्गे यांना दोनदा अटक झाली आहे. या शहरातील गोर-गरीब कामगारांचे कष्टाचे पैसे बुडवणाऱ्या राजू दुर्गे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना वारंवार शरमेने मान खाली घालावी लागली आहे.
भारतीय जनता पार्टीला मी नाही तर राजू दुर्गे हेच आपल्या चित्र-विचित्र पद्धतीचं वागणं व बेताल बोलण्याने वारंवार बदनाम करीत आहेत. राहीला प्रश्न त्यांनी केलेल्या आरोपांचा तर मी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सोबत सन २०११ पासून आहे व त्यांच्या सोबतच २०१४ मधे पक्षात प्रवेश केला आहे. गेली ११ वर्षे मी वाकड परीसरात पक्षाचे काम करीत आहे. मी पक्ष सोडलेला नाही, फक्त पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, तो मंजूर करायचा कि नाही हे पक्ष श्रेष्ठींच्या हातात आहे. त्यामुळे राजू दुर्गे यांच्या सारख्या बदनाम व्यक्तींनी हुजरेगिरी करून बक्षीसी मिळविण्याच्या नादात आमच्या चिंचवडच्या राजकारणात स्वःताची पोळी भाजून घेऊ नये अन्यथा याहीपेक्षा कडक भाषेत उत्तर मिळेल असा इशारा राम वाकडकर यांनी दिला आहे.