गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणेश विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असून शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करताना नागरिकांनी पर्यावरणाचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले आहे.
सांगवी येथे आज गणेश विसर्जन होत असून पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने सांगवीतील सर्व विसर्जन घाटांवर प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता आणि सुरक्षेचा आढावा घेतला. या पथकात सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांचा समावेश होता. सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, वेताळ महाराज घाट, दत्त मंदिर घाट आदी घाटांची पाहणी या पथकाने आज केली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला नागरिक उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. सांगवी येथे आज गणेश विसर्जन होत असून महापालिकेच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी येणारे नागरिक सर्व निर्माल्य निर्माल्य कुंडातच टाकत आहेत. तसेच या विसर्जन घाटांवर ‘गणेश विसर्जन फिरती पथक’ वाहन मूर्ती संकलित करत आहे. या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येणारे नागरिक उस्फुर्तपणे मूर्तीदान करत आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतचे सूचना फलक महापालिकेच्या वतीने लावण्यात आले असून नागरिक देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नवव्या व दहाव्या दिवशी होते. गणेश मंडळांकडील गणेशमूर्तींचे पिंपरी, चिंचवड व भोसरी येथील विसर्जन घाटांवर विसर्जन केले जाते. या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मंडळ व गणेश भक्तांचे दरवर्षी प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून भोसरीतील गणेश मंडळ व गणेश भक्तांचे स्वागत भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महापालिकेच्या स्वागत कक्षात करण्यात येणार आहे. दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश मंडळ आणि गणेश भक्तांचे स्वागत दुपारी ३ वाजेपासून पिंपरी येथील कराची चौक तसेच चिंचवड येथील चाफेकर चौकातील महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात करण्यात येणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता पर्यावरणाचे रक्षण करत सुरक्षित व उत्साहाच्या वातावरणात करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शहरात विविध ठिकणी ८५ गणेश विसर्जन घाट आणि मूर्ती संकलन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ४०फूट बाय ३०फूट आकाराची आणि ५ फूट खोल अशी एकूण १५ भव्य विघटन केंद्रांची स्थापना देखील केली आहे. या विघटन केंद्रांवर प्रथमच गणेशमूर्तींचे रासायनिक प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. या १५ विघटन केंद्रांच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तीचे संकलन केले जात असून महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील २७ विसर्जन घाटांवर लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात ठेवण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विसर्जन घाटांवर सर्पमित्र, जीवरक्षक, सुरक्षारक्षक जवान, अग्निशमनचे जवान तैनात करण्यात आले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांमार्फतही कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून संबधित गणेश विसर्जन घाटांवर आवश्यक ती सुव्यवस्था करण्यात आली आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त १
गणेश विसर्जनाच्या ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने विसर्जन घाटांवर वैद्यकीय साहित्य, औषधांसह वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ब्रदर, वॉर्ड बॉय आदींचा समावेश असलेले पथक उपस्थित राहणार आहे. विसर्जन घाटांच्या ठिकाणी घंटा गाडी, सफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच मुर्ती व निर्माल्य संकलनासाठी मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध पर्यावरण प्रेमी संघटना व स्वयंसेवी संघटनाच्या सहकार्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त २
गणेश विसर्जनावेळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या दिवशी सर्व विसर्जन घाटांवर आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यावर महापालिकेने भर दिला असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विसर्जनानंतर मूर्तीदान व संकलन केंद्रांची मोठ्या प्रमाणात निर्मितीही करण्यात आली आहे. तरी नागरिकांनीही मूर्तीदान करून अथवा कृत्रिम विसर्जन घाटांवर मूर्ती विसर्जित करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे.
– चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त ३