शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका राबविणार अभिनव उपक्रम स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या आधारे होणार शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि देखभाल दुरूस्तीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका लवकरच रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम सुरू करणार आहे. हा अभिनव उपक्रम रस्त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, खड्डे असलेले परिसर ओळखण्यासाठी आणि रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याअंतर्गत स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे (ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी) एकत्रित केलेली रस्त्यांची माहिती महापालिकेच्या भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) प्लॅटफॉर्ममध्ये संकलित केली जाईल. या माहितीद्वारे सततची होणारी खड्डे दुरुस्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून शहराच्या रस्त्यांची एकूण गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात साधारण १ हजार ७०० किलोमीटर लांबीचे क्रॉक्रीट व डांबरी रस्ते आहेत. या रस्त्यांची प्रत्यक्ष तपासणी आणि संरचनात्मक मूल्यांकनांद्वारे (स्ट्रक्चरल असेसमेंट) खड्डे दुरूस्ती कामांच्या गुणवत्ता वाढीला प्राधान्य दिले जाणार आहे. रस्ते दुरुस्ती आणि सुधारणांसाठी तसेच महापालिकेच्या अंदाजपत्रकाचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये पहिला अहवाल सादर करण्यात येणार असून तीन वर्षांसाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम रहिवाशांना सुस्थितीत आणि सुरक्षित रस्ते प्रदान करण्याच्या महापालिकेच्या वचनबद्धतेमधील एक महत्वाचा टप्पा आहे. स्वयंचलित तंत्रज्ञान (ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी) आणि जीआयएस प्रणालीच्या आधारे रस्त्यांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यास तसेच अंदाजपत्रकातील नियोजन आणि रस्ते बांधणीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळणार आहे. सर्वेक्षणानंतर रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी आणि देखभालीसाठी कंत्राटदार व संबंधित अधिकारी या दोघांनाही जबाबदार धरले जाणार आहे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
चौकट – वार्षिक देखभाल अहवाल तयार करण्यासाठी तसेच प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी विकसित करणार ऍप
सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून रस्ता खचणे, खड्डे पडणे तसेच भेगा पडणे यांसारख्या प्रमुख समस्यांची नोंद केली जाईल आणि वार्षिक देखभाल अहवाल तयार करण्यासाठी तसेच खड्डे दुरुस्तीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआयएस-आधारित ऍप देखील विकसित केले जाणार आहे, ज्यामुळे एकाच ठिकाणी सततची होणारी रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे टाळण्यास मदत होईल.
सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून रस्ता खचणे, खड्डे पडणे तसेच भेगा पडणे यांसारख्या प्रमुख समस्यांची नोंद केली जाईल आणि वार्षिक देखभाल अहवाल तयार करण्यासाठी तसेच खड्डे दुरुस्तीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआयएस-आधारित ऍप देखील विकसित केले जाईल, ज्यामुळे एकाच ठिकाणी सततची होणारी रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे टाळण्यास मदत होईल.
मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
चौकट
रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रमाची वैशिष्ट्ये –
१. एकूण रस्त्यांची लांबी
दरवर्षी शहरातील १७०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वेक्षण (रस्त्यांची रुंदी ३ मीटर ते ६१ मीटर)
२. स्वयंचलित रस्ते सर्वेक्षण –
रस्त्यांना भेगा पडणे, खड्डे पडणे आणि रस्ता खचणे या समस्यांची प्रत्यक्ष तपासणी
अंदाजपत्रक आणि रस्ते देखभाल नियोजनासाठी माहिती संकलन
इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार संरचत्नात्मक मूल्यांकन
३. जीआयएस प्रणालीद्वारे माहिती संकलन –
रस्त्यांबाबत संकलित केलेली माहिती महापालिका जीआयएस प्रणालीवर अद्यावत करणार
खड्डे दुरुस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआयएस प्रणालीवर आधारित ॲप तयार करणार
४. उपक्रम कालावधी –
सलग तीन वर्षे दरवर्षी होणार रस्ते सर्वेक्षण (२०२४-२०२६)
वार्षिक देखभाल अहवाल नोव्हेंबरपर्यंत होणार सादर
५. उपक्रमाची उद्दिष्ट्ये –
शहरातील रस्ते सुरक्षा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देणे
रस्त्यांची प्रत्यक्ष तपासणी आणि संरचनात्मक मूल्यांकनांद्वारे अंदाजपत्रकाचे नियोजन करणे
एकाच ठिकाणी सतत पडणारे खड्डे टाळणे आणि एकूण रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे