उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे ‘इच्छा दान गणेश मूर्ती’ उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद; १००० इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांचे वितरण


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नावाजलेल्या पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे उन्न’ती’ चा गणपती महोत्सव अंतर्गत, इच्छा दान गणेश मूर्ती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तर भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते पूर्वनावनोंदनी केलेल्या नागरिकांना मुर्त्या प्रदान करण्यात आल्या. मान्यवरांनी श्री गणरायाच्या मूर्त्यांचे विधिवत पूजन करून उन्नती सोशल फाऊंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधला.



या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना अध्यक्षा डॉ.कुंदा भिसे म्हणाल्या “पर्यावरण पूरक गणेशोत्सव वाढीस लागावा यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन गेल्या ७ वर्षांपासून इच्छा दान ही संकल्पना राबवत आहे. पहिल्या वर्षी २०० मूर्त्यांनी सुरू झालेला हा उपक्रम आज १००० मूर्त्यांवर येऊन ठेपला आहे.”

उद्घाटन प्रसंगी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या “उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून १००० घरांमध्ये पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याचा उन्नती सोशल फाऊंडेशनला मनापासून आनंद आहे. एक प्रकारे एक पर्यावरण पूरक विधायक चळवळ या माध्यमातून सुरू होणार आहे. हा उपक्रम पथदर्शी असून आजूबाजूच्या स्वयंसेवी संस्थांनी देखील या उपक्रमाचे अनुकरण करावे.”
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले “मूर्ती आमची आणि किंमत तुमची ही संकल्पना अभिनव आहे. गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य द्यायला हवे. उन्नतीने उपलब्ध करून दिलेल्या मुर्त्या अतिशय सुबक आणि मनमोहक आहेत. निश्चितच भविष्यात ही एक लोकचळवळ झाल्या शिवाय राहणार नाही.”
याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदा संजय भिसे, संस्थापक संजय भिसे, पी. के. इंटरनॅशनल स्कूल संस्थापक जगन्नाथ आप्पा काटे, लोकमत मुख्य शाखा व्यवस्थापक मयूर केमसे, वाल्मीक काटे, विठाई वाचनालयाचे रमेश वाणी, डॉ.सुभाष चंद्र पवार, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जैस्वाल, मनोज ब्राह्मणकर, सागर बिरारी, बाळकृष्ण चौधरी, यश राक्षे, योगेश चौधरी, विवेक भिसे, अजित भिसे, अशोक घुंबरे, अतुल पाटिल, विजय रोकडे, दिलीप चौघुले, उन्नती सखी मंचच्या रश्मी मोरे, ओंकार मुरकुटे, संकेत नवले, युवराज लांडे, शुभम काटे यांच्यासह विठाई वाचनालयाचे सदस्य, उन्नती सोशल फाउंडेशनचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.








