चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

“मातृत्वाच्या भूमिकेतून शिक्षण देणारे आचार्य म्हणजे शिक्षणाचा आत्मा आहेत!” – ह. भ. प. डॉ. सुभाषमहाराज गेठे

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – “मातृत्वाच्या भूमिकेतून शिक्षण देणारे आचार्य म्हणजे शिक्षणाचा आत्मा आहेत!” असे विचार आळंदी येथील ह. भ. प. डॉ. सुभाषमहाराज गेठे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे  व्यक्त केले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित शिक्षकदिन कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून प्रमुख वक्ते म्हणून संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, तत्त्वज्ञ ह. भ. प. डॉ. सुभाषमहाराज गेठे बोलत होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, माजी उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, शाला समिती अध्यक्ष नितीन बारणे, सदस्य आसराम कसबे, राहुल बनगोंडे, ह. भ. प. रामकृष्ण गेठे, प्रा.डॉ. धनंजय भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुभाषमहाराज गेठे पुढे म्हणाले की, “पाच हजार वर्षांपूर्वी शिक्षणप्रणालीत आचार्यांना प्रमुख स्थान होते. शिक्षक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणारा घटक म्हणजे विद्या आहे. शिक्षकांकडे अद्ययावत ज्ञानाबरोबर हृदयापर्यंत भिडणारे वक्तृत्व असायला हवे. विद्यार्थ्यांना माहीत असलेल्या ज्ञानातून माहीत नसलेल्या ज्ञानापर्यंत आनंदाने नेण्याची किमया शिक्षकांना साधता आली पाहिजे!” यावेळी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जन्मवर्षानिमित्ताने मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व यांचा संगम असलेल्या  त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा थोडक्यात आढावा गेठे यांनी घेतला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या विद्यार्थिनींनी सुरेल स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत केले; तसेच “विश्वगुरु तव अर्चना में भेंट अर्पण क्या करे।” हे आचार्य कृतज्ञतागीत सादर केले.
भारतमाता आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांच्या सुस्वर आवाजातील “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा” या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविक करताना ॲड. सतिश गोरडे यांनी पुढील वर्षभर त्रिशतकोत्तर वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर आणि पंचशतकोत्तर वर्षानिमित्त राणी दुर्गावती यांच्या जीवनकार्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामधून गिरीश प्रभुणे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या; तसेच आगामी काळात पद्मश्री स्वर्गीय प्रभाकर मांडे यांच्या साहित्यावर अभ्यास संगिती घेण्याचे सूतोवाच करताना शिक्षकांनी विद्यादानाचे काम अधिक श्रद्धेने करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी समितीच्या सर्व शिक्षकांना तुळशीचे रोप आणि ‘कर्तृत्वशालिनी अहल्याबाई’ हे पुस्तक भेटस्वरूपात देण्यात आले; तसेच शिक्षकदिनानिमित्त पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या आचार्या अश्विनी ठाकूर (प्राथमिक विभाग), अरुणा साबळे (माध्यमिक विभाग), खिंवसरा पाटील विद्या मंदिरच्या सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार, वीणा तांबे, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका पूनम देशमुख, क्रांतिवीर चापेकर बालक मंदिरच्या सहशिक्षिका संध्या कुलकर्णी, क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरच्या सेविका श्रुती काशीकर, बाळकृष्ण चापेकर बालक मंदिरच्या सेविका नीता धावारे, क्रांतिवीर चापेकर माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक तुषार बाहेकर या सर्व शिक्षकवृंदांचा विशेष सन्मान करण्यात आला.
रत्नाकर चांदसरकर यांनी गुरुकुलम् मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’  ह्या पुस्तकांच्या प्रती भेट म्हणून आचार्य सतिश अवचार यांच्याकडे सुपूर्द केल्या. सहशिक्षिका शुभांगी बडवे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सहशिक्षिका सीमा आखाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. समितीच्या माजी उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button