यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे
पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरवासियांना आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक तसेच शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.
Ø मंडळांनी रहदारीस किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी
गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येणार असून त्यानुषंगाने शाडू माती, धातू, लाकूड, दगड, तूरटी अथवा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेली गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाकडील मार्गदर्शक सुचनांनुसार श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक संदर्भात शासनाकडील सूचनांचे तसेच पोलीस यंत्रणांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती ठेवण्याची किंवा इतर कार्यक्रमांसाठी उपलब्ध जागेमध्येच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास किंवा मंडप उभारण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून रहदारीस किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
Ø मंडळांनी कमीत कमी ध्वनीक्षेपकाचा वापर करावा
सार्वजनिक गणेश मंडळानी श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात सीसीटीव्ही बसविणेबाबत कार्यवाही करावी. आणि श्रींच्या आरती आणि पुजेवेळी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विद्युत रोषणाईचा व ध्वनिक्षेपकाचा वापर कायदेशीर मर्यादेत करावा. आणि ध्वनीची पातळी नियंत्रीत ठेवावी. सार्वजनिक मंडळांनी नागरिकांना श्रीं च्या दर्शनाकरीता दृकश्राव्य किंवा डिजीटल माध्यमांचा वापर करावा. मंडळांनी श्री गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदी द्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करावा. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) व नियम २००० मधील परिच्छेद ४ चे तरतूदीप्रमाणे रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी १०० मीटरचे परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये तसेच मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा कमीत कमी वापर करावा.
याव्यतिरिक्त, मंडळांनी आमंत्रणे दिलेल्या महत्वाच्या निमंत्रितांच्या आगमानाच्या वेळी व कार्यक्रमाच्या दरम्यान आवश्यक ती दक्षता घ्यावी. श्रीं चे मूर्ती परिसरात कार्यक्रम किंवा उपक्रम राबविताना गर्दीचे योग्य नियोजन करावे. तसेच गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
Ø प्लॅस्टिकचा वापर टाळावा अन्यथा करण्यात येणार दंडात्मक कारवाई
गणेशोत्सव कालावधीत रस्ता पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही. सार्वजनिक मंडळ परिसरात फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी दुकाने कमीत कमी असतील याची दक्षता घ्यावी. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रिक्षा सहजपणे जाऊ शकतील एवढी मोकळी जागा ठेवणे आवश्यक राहील. महाराष्ट्र शासनाचे अधिनियमानुसार प्लॅस्टिक पिशव्या व इतर प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी करणेत आली असल्याने त्यांचा वापर टाळावा अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Ø संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना संपर्क साधावा
गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात आग प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. मंडळाजवळ हजर स्वयंसेवक, कार्यकर्ते, नागरिक यांनी मद्यसेवन करु नये तसेच मद्यसेवन केलेल्या व्यक्तीला मंडळाच्या मंडपाजवळ येण्यास प्रतिबंध करावा. तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये. काही अनोळखी, संशयित, बेवारस वस्तु उदा. सुटकेस, रेडिओ, मोठे घड्याळ, जेवणाचे डबे, सायकली वगैरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती, इसम जवळपास फिरताना रेंगाळताना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना संपर्क साधावा. गणेश मूर्तीच्या अंगावर मौल्यवान दागिने असणाऱ्या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रीं च्या मुर्तींचे संरक्षणाकरीता मंडळाचे कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक २४ तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी, असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनाबाबत मार्गदर्शक सूचना
घरगुती गणपतीचे आणि गौरीचे विसर्जन शक्यतो घरी करण्यावर भर द्यावा किंवा मुर्तीदानास प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन मंडपालगत (कृत्रिम हौदामध्ये) करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश विसर्जनाच्या दिवशी (दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस व दहा दिवस ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती व निर्माल्य संकलनाकरीता फुलांनी सजवलेला सुशोभिकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत. तसेच या केंद्रांवर मूर्ती विसर्जन करण्याकरीता नेण्यासाठी वाहने उपलब्ध असणार आहेत. श्रींच्या विसर्जनाकरीता प्रत्येकी २ कन्वेअर बेल्ट एका विसर्जन ठिकाणांवर उपलब्ध असतील. आवश्यकता भासल्यास अधिकचे कन्वेअर बेल्ट उपलब्ध करून देण्यात येतील. निर्माल्य स्विकारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनात निर्माल्य टाकावे. महानगरपालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत रित्या व पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येणार आहे.